रोज वेगळा काय नाश्ता करायचा असा प्रश्न अनेक गृहीणींसमोर असतो. सारखे पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो. फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात नाहीतर चहा-पोळी हा बहुतांश घरातील नाश्ता असतो. पण सकाळचा नाश्ता अतिशय अतिशय महत्त्वाचा असून त्यामध्ये प्रोटीन्स जास्त असायला हवेत. तो तेलकट किंवा फार स्पायसी असून चालत नाही. अशावेळी रोज वेगळं आणि झटपट होईल असं काय करावं असा प्रश्न तमाम महिलांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आज आपण झटपट होतील असे डोशाचे ३ प्रकार पाहणार आहोत. हे डोसे खोबऱ्याची चटणी, लसूण किंवा दाण्याची चटणी, दही, लोणचे किंवा सॉस या कशासोबतही खाता येत असल्याने घाईच्या वेळात नाश्त्याचा प्रश्न राहत नाही (Easy Dosa Recipes).
१. नाचणीचा डोसा
नाचणीचे पीठ आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. नाचणीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्म असल्याने अनेकदा डॉक्टर नाचणीची भाकरी खायला सांगतात. पण ती थोडीशी कोरडी होत असल्याने किंवा सवय नसल्याने आपण ती खात नाही. मात्र भाकरी नको असेल तर नाचणीचा डोसा हा उत्तम पर्याय ठरु शकतो. यासाठी नाचणीच्या पीठात रवा, ताक, तिखट आणि मीठ घालून ते एकजीव करुन घ्यायचे. १० मिनीटांनी तव्यावर डोसे घालायचे. अतिशय छान डोसे निघतात. नाचणी पौष्टीक असल्याने आरोग्यासही चांगले.
२. डाळींचे डोसे
रात्री झोपताना उडीद डाळ, मूग डाळ आणि हरभरा किंवा मसूर किंवा तूर यांपैकी उपलब्ध असेल ती कोणतीही डाळ समप्रमाणात भिजत घालायचे. सकाळी उठल्यावर हे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचे. मिक्सर करतानाच त्यामध्ये आलं-मिरची आणि लसूण घालायचे. या पीठात आवश्यकतेनुसार पाणी घालून मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तव्याला तेल लावून डोसे घालायचे. अतिशय छान सुळसुळीत डोसे निघतात.
३. रवा डोसा
रवा आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात घ्यायचे. त्यात ताक किंवा दही, मीठ, साखर आणि ओवा घालायचे. अंदाजे पाणी घालून १० मिनीटे झाकून ठेवायचे. त्यानंतर तव्यावर डोसे घालायचे. अतिशय छान कुरकुरीत हलके डोसे निघतात. हे डोसे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतात.