जेवायला पोळी-भाजी म्हटलं की मुलं नाक मुरडतात. मुलंच काय अनेकदा आपल्यालाही पोळी आणि भाजी खाण्याचा कंटाळा येतो. पण याऐवजी पिझ्झा, पास्ता, फ्रँकी असे वेस्टर्न प्रकार असले की मग मात्र मुलं खूश होतात. बरेचदा सकाळच्या डब्यालाही वेगळं काय द्यायचं असा महिलांना प्रश्न असतो. अशावेळी कॅफे किंवा हॉटेलमध्ये मिळणारी फ्रँकी म्हणजेच पोळीचा रोल अतिशय छान पर्याय होऊ शकतो. यामध्ये आपण उकडलेल्या अंड्याचे काप, पनीर, भाज्या, सॅलेड, कडधान्य असे काहीही घालू शकतो. त्यामुळे पौष्टीक पदार्थ पोटात जाण्यासही मदत होते आणि मुलांनाही वेगळं खाल्ल्याचा आनंद मिळतो. रोल असल्याने हा प्रकार खायलाही सोयीचा असतो, पाहूयात ही चटपटीत फ्रँकी नेमकी कशी करायची (Easy Frankie wrap Recipe at Home)...
१. आपण नेहमी पोळ्या करतो त्याचप्रमाणे पोळ्या करुन घ्यायच्या.
२. कॉर्न, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, ग्रीन सॅलेड, कोबी अशा पिझ्झासाठी ज्या भाज्या वापरु शकतो त्या भाज्या उभ्या बारीक चिरुन घ्यायच्या.
३. आवडीनुसार पनीर, टोफू, मशरुम, ऑलिव्हज, बेबी कॉर्न असे मुलांना आवडेल ते घ्यायचे.
४. एका पॅनमध्ये थोडं तेल घालून त्यामध्ये या उभट चिरलेल्या भाज्या आणि पनीर किंवा मशरुम वगैरे घालायचे.
५. यावर मिरपूड, मिक्स हर्ब, मीठ घालून सगळे अर्धवट शिजेल इतकी वाफ द्यायची.
६. पोळी घेऊन त्यावर बटर किंवा तूप लावून ही भाजी त्यावर पसरायची.
७. आवडीनुसार या भाजीवर मायोनिज, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि चीज किसून घालायचे.
८. पोळीचा हा रोल बंद करायचा आणि दोन्ही बाजुने तूप किंवा बटरवर खरपूस भाजून घ्यायचा.
९. या गरमागरम रोलचे लहान तुकडे करुन ते डब्यात भरले की खायलाही सोपे होतात आणि चविष्टही लागतात.