आरोग्याच्या दृष्टीनं आवळा वरदान आहे. लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, बी कॉम्प्लेक्स हे सर्व आवळ्यात मोठ्या प्रमाणात असतात. म्हणूनच डोळे, केस, पोट, हाडं सुदृढ ठेवायची असतील तर आवळा नेहमी खायला हवा. हिवाळ्यात च्यवनप्राश आवर्जून खाल्ला जातो. च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आजारांशी दोन हात करायला ताकद मिळते. यासह दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. कारण हिवाळ्यात सर्दी - खोकल्याची समस्या ही चालूच राहते. थंडीच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. यासाठी आपण च्यवनप्राशचं सेवन अधिक प्रमाणावर करतो (Easy Home made Chavanprash Recipe).
बाजारातून आणलेल्या च्यवनप्राशनध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. तसेच पोषक घटकांचे प्रमाण किती आहे असा प्रश्नही आपल्याला काही वेळा पडतो. त्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने च्यवनप्राश तयार करता येऊ शकते. ही रेसिपी अगदी सोपी असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच नियमीत च्यवनप्राश खाणे फायदेशीर असते. हिवाळ्यात च्यवनप्राश खाल्ल्याने यातील वनौषधींमुळे शरीरात उष्णता टिकून राहते. हिवाळ्यातील ताप, सर्दी, खोकला किंवा इतर संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असल्याने च्यवनप्राशचा फायदा होतो. विविध प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून दूर राहण्यास याचा फायदा होतो. पाहूयात घरच्या घरी च्यवनप्राश कसे करायचे.
१. साधारण अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून इडली पात्रामध्ये उकडून घ्यायचे.
२. चांगले शिजल्यावर या आवळ्याच्या अगदी सहज फोडी निघतात. गार झाल्यावर त्यातील बिया काढून घ्यायच्या.
३. मिक्सरच्या भांड्यात या फोडी घालून याची बारीक पेस्ट करायची.
४. कढईमध्ये ३ ते ४ चमचे तूप घालून त्यामध्ये ही पेस्ट घालायची.
५. अर्धा किलो गूळ बारीक चिरुन घ्यायचा आणि तो या कढईत घालायचा.
६. २ तमालपत्र, १ दालचिनीची काडी, १ चमचा जीरे, १ चमचा बडीशोप, २ चमचे सुंठ पावडर घ्यायचे.
७. ३ ते ४ पिंपळी, ५ लवंगा, ६ ते ७ काळी मिरी, अर्ध्या जायफळाची पावडर, ५-६ लवंगा हे सगळे मसाल्याचे पदार्थ एकत्र घ्यायचे.
८. मसाल्याचे हे सगळे पदार्थ भाजून मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची पूड करुन घ्यायची.
९. आवळा आणि गूळाच्या मिश्रणात ही मिक्सर केलेली पूड गाळणीने गाळून घालायची आणि सगळे एकजीव करुन नीट शिजवून घ्यायचे.
१०. यामध्ये केशर घालून एका बरणीत हे च्यवनप्राश भरुन ठेवायचे आणि रोज न चुकता १ चमचा खायचे.