सणावाराच्या काळात किंवा एरवीही आपण बटाट्याची भाजी करतो. इतकेच नाही तर बटाट्याचे पराठे, पावभाजी असे वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी किंवा आणखी काही करण्यासाठी आपल्याला उकडलेल्या बटाट्याची सालं काढावी लागतात. हे बटाटे कुकरमधून काढलेले असल्याने आपल्या हाताला त्याचे चटके बसतात. मग थोडे गार पाण्याखाली धरुन आपण हे बटाटे गार होण्याची वाट पाहतो. पण स्वयंपाकाची घाई असल्याने आपण हाताला चटके बसत असताना ही सालं कशीबशी काढतो. त्यानंतर एकतर बटाट्याच्या फोडी करतो किंवा तो स्मॅश करतो. पण पावभाजी किंवा कटलेट, पराठे यासाठी बटाटे स्मॅश करायचे असतील तर आतल्या बाजुने ते गरम असल्याने हात जास्तच पोळतात. पण असे हाताला चटके बसवण्यापेक्षा एक छोटीशी ट्रिक वापरली तर आपण बटाट्याची सालं तर झटपट काढू शकतोच पण बटाटाही अगदी सहज स्मॅश होऊ शकतो. यामध्ये आपल्या हातालाही अजिबात चटका बसत नाही. पाहूयात ही ट्रिक कोणती आणि ती कशी करायची (Easy Hot Potato Peeling Hack Kitchen Tips).
१. उकडलेले बटाटे एका ताटलीत काढून सुरीने आधी अर्धे चिरुन घ्यायचे.
२. त्यानंतर हा अर्धा केलेला बटाटा पुऱ्या तळतो तो मोठ्या आकाराचा तारेचा झारा घ्यायचा आणि त्यात वाटीने हा बटाटा दाबायचा.
३. यामुळे बटाटा झाऱ्याच्या खाली जाईल आणि साल वरच्या बाजूला राहील ते काढून बाजूला फेकून द्यायचे.
४. यामध्ये बटाट्याचा हाताला स्पर्श होत नसल्याने तो गरम लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
५. ताटलीमध्ये स्मॅश केलेला बटाटा पडल्याने हाताने किंवा आणखी कशाने तो स्मॅश करण्याचीही चिंता राहत नाही.
६. अशाप्रकारे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन आपण आपली दैनंदिन कामे सोपी करु शकतो.