Join us  

पीठ न आंबवता, सोडा न घालता करा पौष्टीक-कुरकुरीत डोसे; झटपट होणारी चविष्ट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 3:03 PM

Easy Instant Healthy Dosa Recipe : डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने मुलं डाळी खात नसतील तर त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे.

सतत पोळी-भाजी खाऊन कंटाळा आला की नाश्त्याला किंवा जेवणाला वेगळं काय करायचं असा प्रश्न महिलांना सतत पडतो. नाश्ता म्हटलं की पोहे, उपमा, खिचडी यांशिवाय फार वेगळे पर्याय आपल्याकडे नसतात. तर जेवणाला सतत पोळी-भाजी, भात-आमटी आणि कोशिंबीर, चटणी हे ठरलेले पदार्थ असतात. पण विकेंडला किंवा एरवीही आपल्याला कधीतरी वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते. मग एकतर आपण हॉटेलमध्ये जातो किंवा घरी ऑर्डर करतो. पण बाहेरच्या पदार्थांतून शरीराचे पुरेसे पोषण होत नाही. तसेच या पदार्थांमध्ये नेमके कोणते घटक वापरलेले असतात तेही आपल्याला माहित नसते (Easy Instant Healthy Dosa Recipe). 

साऊथ इंडीयन हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे, पौष्टीक आणि पोटभरीचे पदार्थ. पण घरी करायचे म्हणजे त्यासाठी डाळ-तांदूळ भिजत घालायचे, हे पीठ वाटायचे आणि आंबवायला ठेवायचे आणि मग त्याचे इडली, डोसा, आप्पे असे काही ना काही करायचे. पण आज आपण अगदी २ ते ३ तास डाळी भिजवून त्यापासून करता येईल असा पौष्टीक डोसा कसा करायचा ते पाहणार आहोत. डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने मुलं डाळी खात नसतील तर त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे. डोसा खायची इच्छा झाली की पुढच्या २ ते ३ तासात हा डोसा करणे शक्य होत असल्याने आपली डोसा खायची इच्छाही सहज पूर्ण होऊ शकते, पाहूया हा डोसा कसा करायचा...

साहित्य - 

१. तांदूळ - २ वाटी 

२. उडीद डाळ - पाव वाटी 

३. हरभरा डाळ - पाव वाटी

(Image : Google )

४. मूग डाळ - पाव वाटी

५. मसूर डाळ - पाव वाटी

६. मेथी दाणे - अर्धा ते पाऊण चमचा

७. जीरे - १ चमचा 

८. लाल मिरच्या ४ ते ५

९. कडीपत्ता - ७ ते ८ पाने 

१०. मीठ - चवीनुसार 

कृती - 

१. तांदूळ, सगळ्या डाळी आणि मेथ्या एका मोठ्या भांड्यात एकत्र करुन स्वच्छ धुवून घ्यायच्या. 

२. यामध्ये जीरं, लाल मिरच्या आणि कडीपत्ता घालायचा.

३. कोमट पाणी घालून हे सगळे साधारण २ तास झाकून भिजवून ठेवायचे. 

४. त्यानंतर पाणी काढून टाकून सगळे चांगले मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. 

५. थोडी घट्टसर कन्सिस्टंन्सी ठेवून यामध्ये मीठ घालायचे आणि पीठ एकजीव करुन झाकून ठेवायचे. 

६. पीठ पुन्हा १५ मिनीटे झाकून ठेवून चटणी किंवा सांबार, भाजी यांची तयारी करायची. 

७. त्यानंतर तव्याला तेल लावून पीठ घालून ते भरपूर पसरायचे म्हणजे डोसे कुरकुरीत होण्यास मदत होते. 

८. डोसा करताना दोन्ही बाजुने आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप लावावे आणि खरपूस भाजून घ्यावा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.