Join us  

हिवाळ्यात लिंबं स्वस्त, १० मिनिटांत करा लिंबाचं आंबटगोड लोणचं! सोपी झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 12:36 PM

Easy Lemon Pickle Recipe : आमटी-भात, उपमा, पोहे, धिरडी असे कशासोबतही हे लोणचे फार चविष्ट लागते.

लिंबामध्ये सी व्हिटॅमिन असल्याने आहारात लिंबाचा आवर्जून समावेश असायला हवा असं आपल्याला सांगितलं जातं. म्हणूनच आपण वरण भात, भाजी, पोहे, उपमा यांसारख्या पदार्थांवर आवर्जून लिंबू पिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आपण आवर्जून लिंबू सरबत पितो जेणेकरुन उन्हाचा त्रास काही प्रमाणात कमी होईल. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबाचे भाव वाढलेले असतात. पण हिवाळ्यात मात्र लिंबाची आवक भरपूर होत असल्याने लिंबाचे भाव उतरतात. अगदी १० रुपयांना ७ ते ८ लिंबंही सहज मिळतात. एरवी १० रुपयांना २ किंवा ३ मिळणारी लिंबं इतकी स्वस्त मिळत असल्याने आपण लिंबू जपून खातो. पण स्वस्त झाल्यावर आपण या लिंबाचे लोणचे नक्कीच करुन ठेवू शकतो (Easy Lemon Pickle Recipe). 

चवीला आंबट गोड असणारे हे लोणचे जेवणाची रंगत वाढवते. आमटी-भात, उपमा, पोहे, धिरडी असे कशासोबतही हे लोणचे फार चविष्ट लागते. इतकेच नाही तर उपवासासाठीही हे लोणचे चालत असल्याने तुम्ही उपवास करत असाल तर हे लिंबू लोणचे तुम्हाला नक्कीच चालू शकते. चवीला आंबट गोड आणि तोंडाला चव येईल असे हे लोणचे कमीत कमी पदार्थात अगदी झटपट होणारे आहे. विकत हे लोणचे खूप महाग मिळत असल्याने थंडीच्या दिवसांत आपण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे आणि आरोग्यासाठी उपयुक्त असे हे लोणचे नक्की ट्राय करा..

साहित्य - 

१. लिंबू - अर्धा किलो 

२. साखर किंवा गूळ – अर्धा ते पाऊण किलो 

३. मीठ – अर्धी वाटी

(Image : Google)

४. तिखट – पाव वाटी 

कृती - 

१. सगळ्यात आधी लिंबं स्वच्छ धुवून पुसून पूर्ण कोरडी करायची. 

२. नंतर त्याच्या बारीक फोडी करून शक्य तितक्या बिया काट्या चमच्याने काढून घ्यायच्या. 

३. एका पातेल्यात साखर आणि मीठ घालून त्यामध्ये या फोडी घालायच्या.

४. गॅस लावून सगळे चांगले शिजून द्यायचे आणि नंतर अंदाजे थोडे तिखट घालायचे. 

५. लिंबांच्या आंबटपणाचा अंदाज घेऊन साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकतो. 

६. आवडत असल्यास बाजारात मिळणारा लिंबू लोणचे मसाला घालायचा नाहीतर नाही घातला तरी चालतो. 

७. आवडत असल्यास या लोणच्यात मिरचीचे बारीक तुकडे करुन घातले तरी छान लागते. 

८. साधारण सगळे चांगले एकजीव होऊन साखर विरघळेपर्यंत हे सगळे चांगले शिजवायचे आणि हलवत राहायचे.

९. लिंबाची फोड शिजून थोडी मऊसर झाली असे वाटले की गॅस बारीक करुन हे मिश्रण चांगले गार होऊ द्यायचे.

१०.  मग लोणचे बरणीमध्ये भरताना पुन्हा खाली, मध्यभागी आणि वर थोडे मीठ घालून मग लोणचे भरुन ठेवायचे. किमान ४ ते ५ दिवसांत हे लोणचे छान मुरते.

११. हे लोणचे ६ ते ८ महिने नक्की टिकते, आपल्याकडे दमट हवा आहे असे वाटल्यास आणि भुरा येईल अशी शक्यता वाटल्यास लोणचे फ्रिजमध्ये ठेवले तरी चालते.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.