सकाळी उठल्यावर नाश्त्याला आणि डब्याला काय करायचं असा प्रश्न आपल्यासमोर असतो. मुलांना आणि इतरांनाही हेल्दी तरीही वेगळं असं काय द्यायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. सतत पोळी-भाजी खाऊनही कंटाळा आलेला असतो. पोळ्या करायच्या तर कणीक मळणे, काही वेळ ती मुरण्यासाठी ठेवणे, मग त्याचे गोळे करुन एकसारख्या पोळ्या लाटणे आणि या पोळ्या चांगल्या भाजणे अशा बऱ्याच स्टेप्स असतात. तसंच पोळी केली की सोबत भाजी, आमटी, कोशिंबीर असंही सगळं लागतं. पण सकाळच्या घाईत झटपट एकच पदार्थ करायचा असेल तर पराठे हा उत्तम पर्याय असतो. पण पीठ न मळता अगदी मऊ, लुसलुशीत छान मसाला पराठे कसे करायचे ते आपण आज पाहणार आहोत. हे पराठे गरम असताना तर छान लागतातच पण डब्यात न्यायलाही हा चांगला पर्याय असतो. पाहूयात हे पराठे कसे करायचे (Easy masala Paratha Recipe for Tiffin or Breakfast)...
१. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये १ वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यात अर्धा चमचा हळद, गरम मसाला, तिखट आणि मीठ घालायचे.
२. या पीठात साधारण २ कप पाणी घालून ते आपण डोशाचे किंवा धिरड्याचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे चांगले घट्टसर भिजवून घ्यायचे.
३. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तसेच घरात उपलब्ध असतील त्या बीट, गाजर, कोबी यांसारख्या भाज्या किसून घालायच्या. आवडीनुसार यामध्ये तुम्ही आलं-लसूण-मिरची घालू शकता.
४. हे पीठ गुठळ्या होणार नाहीत असं चांगलं एकजीव करुन घ्यायचं आणि तवा तापवून त्यावर तेल घालून पीठ घालायचं. डोशाप्रमाणे पातळ न घालता थोडं जाडसर करायचं. म्हणजे ते अगदी मऊ न होता पराठ्यासारखे होते.
५. तेल किंवा तूप घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतल्यावर हा पराठा दही, चटणी नाहीतर सॉससोबत खायला घ्यायचा. गरम पराठा फारच मऊ आणि छान लागतो. डब्यातही आपण मुलांना हा पराठा देऊ शकतो.