हिवाळा सुरु झाला की बाजारात हिरवेगार मटार आणि लालचुटूक गाजरं दिसायला लागतात. मग साहजिकच आपण मटार आणि गाजराचे वेगवेगळे पदार्थ करतो. एरवी आपल्याला फ्रोजन मटार वापरावे लागतात. हे मटार साठवलेले असल्याने त्याला म्हणावी तशी चव नसते. पण आता बाजारात आलेले ताजे मटार चवीला अतिशय गोड लागतात. तसेच हे मटार कोवळे असल्याने ने नुसते खायलाही मस्त लागतात. मटारमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यासाठीही मटार खाणे फायद्याचे असते. रात्रीच्या वेळी जेवणाला आपण अनेकदा वरण-भात किंवा खिचडी, मसालेभात असे काही ना काही करतो. पण नेहमी तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी मटारच्या सिझनमध्ये मस्त गरमागरम मटार पुलाव केला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. यासोबत टोमॅटो सूप, मिक्स व्हेज सूप केले तर याची रंगत आणखी वाढते. आता हा पुलाव परफेक्ट मोकळा आणि चविष्ट व्हावा यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया (Easy Matar Green Peas pulao Recipe)...
साहित्य -
१. बासमती तांदूळ – १.५ वाटी
२. मटार – १ वाटी
३. काजू - ८ ते १०
४. तेल – २ चमचे
५. लवंग – २ ते ३
६. काळी मिरी - ३ ते ४
७. तमालपत्र – २ पाने
८. दालचिनी - १ इंचाची काडी
९. लवंग – २ ते ३
१०. जीरे - अर्धा चमचा
११. हिरवी मिरची - २ ते ३
१२. कोथिंबीर – अर्धी वाटी
१३. मीठ – चवीनुसार
कृती -
१. कढई किंवा कुकरमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरे घालावे.
२. मग यामध्ये सगळा खडा मसाला, काजू आणि मिरचीचे तुकडे घालून ते चांगले परतून घ्यावे.
३. यामध्ये धुतलेले मटार आणि तांदूळ घालून तो चांगला परतून घ्यावा.
४. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये गाजर, फरसबी, फ्लॉवर, पनीर अशा इतर भाज्याही घालू शकता.
५. तांदूळ जितका आहे त्याच्या दुप्पट पाणी घालून यामध्ये मीठ घालावे.
६. एक उकळी आली की गॅस बारीक करुन कढईवर झाकण ठेवावे किंवा कुकरचे झाकण लावावे.
७. साधारण २ ते ३ शिट्ट्या झाल्यावर किंवा कढईतले पाणी आटल्यावर गॅस बंद करुन वाफेवर भात शिजू द्यावा.
८. कोथिंबीर आणि तूप सोडून गरमागरम भात सूप, तळण यांसोबत खायला घ्यावा.