कचोरी म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते आणि स्वीट मार्टमध्ये मिळणारी कचोरी डोळ्यासमोर येते. पण बाहेरची कचोरी कोणत्या तेलात तळलेली असते, त्यामध्ये कोणत्या दर्जाचे जिन्नस वापरलेले असतात हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे पोटाला त्रास होण्याचीही शक्यता असते. मटारच्या सिझनमध्ये आपण मटारचे करंजी, मटार उसळ, मटार भात, कटलेट असे बरेच पदार्थ ट्राय करतो. पण याच मटारपासून होणारी कचोरीही अतिशय छान लागते. ही कचोरी झटपट होणारी असल्याने घरातील सगळेच आवडीने खाऊ शकतात. अगदी कमीत कमी पदार्थांत आणि तरीही चविष्ट होणारी ही मटार करंजी नेमकी कशी करायची पाहूया (Easy Matar Kachori Recipe)...
१. कणिक मळतो त्या भांड्यात २ वाटी मैदा किंवा गव्हाचे पीठ घ्यावे. त्यामध्ये तूप आणि मीठ घालुन हे पीठ घट्टसर भिजवून घ्यावे.
२. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जीरे, हिंग, आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची.
३. यामध्ये साधारण २ वाटी ओबडधोबड बारीक केलेले मटार, मीठ, तिखट, गरम मसाला, हळद आणि लिंबाचा रस घालावा.
४. हे सगळे चांगले परतून घेऊन एकजीव करावे आणि गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे.
५. मग कणकेचा गोळा घेऊन तो हाताने पसरून घ्यावा. त्यामध्ये मटारच्या सारणाचा गोळा घालून हा गोळा बंद करावा.
६. हातानेच जाडसर कचोरीचा आकार देऊन या कचोऱ्या तापलेल्या तेलात दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्याव्या.
७. चिंचेची चटणी, मिरची किंवा सॉस यांच्यासोबत या गरम कचोऱ्या अतिशय छान लागतात.