Join us  

थंडीत सतत चहा-कॉफी घेण्यापेक्षा करा गरमागरम व्हेज सूप, १० मिनीटांत होणारी हेल्दी-टेस्टी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2023 4:13 PM

Easy Mix Veg Soup Recipe for Winter season : विविध रंगांच्या, चवीच्या भाज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पोटात गेल्यास व्हिटॅमिन्स, खनिजे मिळण्यास मदत होते.

हवेत गारठा वाढला की आपल्याला सतत काही ना काही गरम, चमचमीत खावेसे किंवा प्यावेसे वाटते. अशावेळी आपण एकतर गरम पाणी पितो नाहीतर सतत चहा-कॉफी घेत राहतो.एखादवेळी चहा किंवा कॉफी घेणे ठिक असले तरी सतत ही पेय घेणे आरोग्यासाठी चांगले नसते. पावसाळा संपून हिवाळा सुरू होताना गारठा वाढल्याने अनेकांना सर्दी-खोकला होण्याचीही शक्यता असते. आपले शरीर नव्याने येणाऱ्या ऋतूशी जुळवून घेत असल्याने या सगळ्या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागते.अशावेळी लगेच डॉक्टरांकडे औषधे घेण्यापेक्षा  सूप पिणे केव्हाही उत्तम. यामुळे घशाला आराम मिळतो, गरम खाल्ल्याचा आनंद मिळतो आणि शरीराचे पोषण होण्यासही मदत होते. थंडीच्या दिवसांत बाजारात भाज्या मुबलक आणि अतिशय चांगल्या, स्वस्त मिळत असल्याने या काळात व्हेज सूप आपण अगदी सहज करु शकतो. शरीराला ताकद मिळेल अशा विविध रंगांच्या, चवीच्या भाज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पोटात गेल्यास व्हिटॅमिन्स, खनिजे मिळण्यास मदत होते. हे सूप पोटभरीचे असून ते करण्याची सोपी-झटपट रेसिपी पाहूया (Easy Mix Veg Soup Recipe for Winter season)...

साहित्य - 

१. फ्लॉवर - कोबी - १ वाटी 

२. फरसबी - १ वाटी 

३. हिरवा किंवा लाल भोपळा - १ वाटी 

४. टोमॅटो - १ 

५. बीट - गाजर - १ वाटी 

(Image : Google)

६. मक्याचे दाणे - अर्धी वाटी

७. मीरे, दालचिनी, लवंग - प्रत्येकी २  

८. मीठ - चवीपुरते 

९. आलं-लसूण पेस्ट - अर्धा चमचा 

१०. साखर - चवीपुरती

कृती -

१. घरात उपलब्ध असतील त्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यायच्या.

२. या भाज्या कुकरच्या भांड्यात घालून त्यात पाणी घालून २ शिट्ट्या काढून चांगल्या शिजवून घ्यायच्या.भाज्या शिजतानाच त्यामध्ये मिरी, लवंग आणि दालचिनी घालायची.

३. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून आलं-लसूण पेस्ट घालून ती चांगली परतून घ्यावी

४. यामध्ये शिजलेल्या भाज्या पाण्यासहीत घालाव्यात. 

५. कॉर्न नसतील तर एका वाटीत कॉर्न फ्लोअर घेऊन त्यात पाणी घालून ते चांगले मिसळून घ्यावे आणि कढईत घालावे. यामुळे घट्टपणा येण्यास मदत होते. 

६. सूप चांगले शिजत आले की त्यामध्ये मीठ आणि साखर घालावी. चांगले उकळल्यानंतर गरमागरम सूप पिण्यास तयार होते. 

७. भाज्या कुकरमध्ये आणि पुन्हा कढईमध्ये शिजल्याने चांगल्या मऊ होतात. पण लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तींना द्यायचे असल्यास हे सगळे झाल्यावर सूप मिक्सरमधून काढून बारीक करुन घेतले तरी चालते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.थंडीत त्वचेची काळजी