जेवण झाले की बहुतांश पुरुष पान खातात. आपणही बरेचदा बडीशेप किंवा सुपारी खातो. यामुळे जेवण पचायला चांगली मदत होते. पानात कॅल्शियम असल्याने जेवणानंतर पान आवर्जून खायला हवे असे सांगितले जाते. मात्र आपल्याकडून तितक्या नियमाने हे पान खाल्ले जात नाही. जेवणाचे चांगले पचन व्हावे, म्हणून मुखवास खाणे योग्यच आहे. पण मुखवास म्हणून एकच पदार्थ खाण्यापेक्षा आपण त्यात आणखी काही पदार्थ टाकले तर तो मुखवास आरोग्याबरोबरच केस, त्वचा आणि दातांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर असते. पानात कॅल्शिअम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स विड्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्य विषयक अनेक समस्यांसाठी विड्याचं पान नियमित खाणे, हा एक उत्तम उपाय आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हा मुखवास तयार करु शकतो (Easy Mukhwas Recipe Benefits of having Paan Vida).
साहित्य -
१. विड्याची पाने - १० ते १२
२. बडीशेप - पाव वाटी
३. धणा डाळ - पाव वाटी
४. बडीशेपच्या गोळ्या - पाव वाटी
५. कात पावडर - १ चमचा
६. टूटी फ्रूटी - २ चमचे
७. गुलकंद - १ चमचा
८. बहार - १ चमचा
९. खजूर - अर्धी वाटी बारीक तुकडे
कृती -
१. विड्याची पाने घेऊन ती स्वच्छ धुवून वाळवावीत.
२. या पानाच्या काड्या काढून टाकून त्याचे कात्रीने बारीक तुकडे करायचे.
३. एका बाऊलमध्ये बडीशेप, धणाडाळ, बडीशेपच्या गोळ्या आणि कात एकत्र करुन घ्यायचे.
४. त्यामध्ये टूटी फ्रूटी, गुलकंद आणि खजूराचे बारीक तुकडे घालायचे.
५. यात कात आणि बहार घालायचे, हे दोन्ही पानाच्या दुकानात सहज मिळते.
६. यात बारीक चिरलेली पाने घालून हे मिश्रण हाताने एकजीव करायचे.
७. जेवणानंतर हा मुखवास खाल्ल्यास अन्न पचायला मदत होते आणि गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते.
विड्याचं पान खाण्याचे फायदे
१. काही जणांच्या तोंडात बॅक्टेरिया संसर्ग झाल्यामुळे त्यांच्या तोंडाला कायम दुर्गंधी येते. संसर्ग कमी करून तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी नियमितपणे विड्याचे पान खावे.
२. काही जणांना अजिबातच भूक लागत नाही. अशा लोकांची भूक वाढविण्यासाठी त्यांना विड्याच्या पानात मिरेपुड टाकून खाण्यास द्यावं. मिरेपुड अगदी चुटकीभर टाकावी. असा उपाय नियमित केल्यास भूक वाढते.
३. मायग्रेन किंवा डोकेदुखी असा त्रास होत असल्यास विड्याचं पान खावं.
४. मधुमेह असणाऱ्यांसाठी देखील विड्याचं पान नियमितपणे खाणं फायद्याचं ठरतं. कारण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी विड्याचं पान उपयुक्त ठरतं. याच कारणामुळे गोडाधोडाचं जेवण झाल्यावर सणावाराला आपल्याकडे विड्याचं पान आवर्जून खाण्याची प्रथा आहे.
५. सर्दी, खोकला, कफ. घसा बसणे असा त्रास उद्भवल्यास विड्याच्या पानाला मध लावून ते खायला द्यावे.
६. ॲसिडीटी, अपचन असा त्रास होत असल्यास विड्याचं पान खायला द्यावं. पचनशक्ती सुधारण्यासाठी विड्याचं पान खूपच उपयुक्त ठरतं.
७. दातांचे आरोग्य राखण्यासाठी तसेच हिरड्यांच्या मजबुतीसाठी विड्याचं पान बारीक चावून खावं.
८. निद्रानाशाचा त्रास होत असल्यास दररोज रात्री विड्याचं पान मीठ आणि ओवा टाकून चावून- चावून खावं. यामुळे चांगली झोप लागते आणि निद्रानाशाचा त्रास कमी होतो.