Join us  

कुरकुरीत, गरमागरम भज्यांच्या 'या' ५ रेसेपीज नक्की ट्राय करून पाहा; एकदा खाल तर खात राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 4:15 PM

Easy Pakoda Recipe's : अनेकदा मुलं पालेभाज्या खाण्याचा कंटाळा करतात. त्यावेळी त्यांना याच पालेभाज्यांपासून हटके पदार्थ करून खाऊ घालू शकता. 

ठळक मुद्देसध्या कोरोना आणि बरेच नवीन आजार मान वर काढत असल्यामुळे बाहेरचं वडा, भजी खायचं म्हणजे भीती वाटते त्यात पावसाळ्यात तर बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद होतं.

जरासा पाऊस काय पडला तर आपल्या सगळ्यांना लगेच चहा आणि भजी खाव्याश्या वाटतात. कधी एकदा घरी गरमागरम भज्या, आळूवड्या बनवल्या जातील याची आपण वाट पाहतो. सध्या कोरोना आणि बरेच नवीन आजार मान वर काढत असल्यामुळे बाहेरचा वडा, भजी खायचं म्हणजे भीती वाटते. त्यात पावसाळ्यात तर बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद होतं. जर तुम्ही घरी त्याच त्याच भज्या खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही नवीन रेसिपीज सांगणार आहोत.  स्वयंपाक घरात नेहमी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या बनवू शकता. 

पालकची भजी 

एका पातेल्यामध्ये बेसनाचं पिठ घ्या, बेसन पिठामध्ये चिरलेला पालक, हिंग, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करा. मग एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर मिश्रणाच्या खमंग भजी तळून घ्या. अनेकदा मुलं पालेभाज्या खाण्याचा कंटाळा करतात. त्यावेळी त्यांना याच पालेभाज्यांपासून हटके पदार्थ करून खाऊ घालू शकता. 

 मेथी गोटा भजी 

ही थोडी वेगळ्या प्रकारची भजी आहे. सर्वात आधी मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून बारिक चिरून घ्या. त्यानंतर मिरच्या, आलं, लसूण एकत्र वाटून घ्या. मग बेसन पिठ भिजवून घ्या.  त्यानंतर सगळं बेसनाच्या पिठामध्ये एकत्र करून घ्या. त्यामध्ये जिरं, कोथिंबीर, मीठ आणि रवा घालून एकत्र करा.  कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भजी तळून घ्या. गरमा गरम भजी खाण्यासाठी तयार आहेत. चटणी किंवा सॉससोबत तुम्ही भजी खाऊ शकता. 

कांदाभजी

कोणताही ऋतू असो हिवाळा, पावसाळा किंवा मग उन्हाळा, निवांत क्षण अजून आनंददायी बनवण्यासाठी कांदा भजीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी आधी कांदा पातळसर कापून त्यावर मीठ घालून १५ मि. बाजूला ठेवा म्हणजे कांद्याला पाणी सुटेल. मग 1 कप बेसन, 4 , हिरव्या मिरच्या, थोडे जाडसर कुटलेले धणे, चवीनुसार मीठ, हळद, तिखट हे साहित्य एकत्र करून छान मळून घ्या. जेणेकरून कांद्याच्या पाण्यात सगळे साहित्य एकजीव होईल. नंतर तेल गरम करून भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. ही भजी तुम्ही चहासोबत संध्याकाळच्यावेळी खाऊ शकता. 

मूग डाळ भजी

मूग डाळ आधी चार तास स्वच्छ धुऊन भिजत घालावी. तासानंतर मुगाची डाळ पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्यावी. नंतर मुगाची डाळ मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन त्यात मीठ, जीरं पावडर, तिखट, हळद घालून पाच मिनिटं फेटून घ्यावी. त्यामुळे भजी मस्त गोल गोल फुगते, आतून हलकी वरून कुरकुरीत होते आणि खुशखुशीत ही लागते. गरम तेलामध्ये भजीचे पीठ सोडून छोट्या गोल गोल मुग डाळ भजी सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. सॉस किंवा चटणीसोबत तुम्ही ही भजी खाऊ शकता. 

 बटाटा भजी

बटाटे सगळ्यांच्याच घरात नेहमी उपलब्ध असतात. बटाटे सोलून पातळ चकत्या करून साध्या पाण्यात साधारण २० मिनिटे घालून ठेवावेत. बटाट्याच्या चकत्या पाण्यात भिजताहेत तोवर एका मध्यम वाडग्यात बेसन तांदूळ पिठ एकत्र करून त्यात ३ ते ४ टेस्पून पाणी घालून पिठ भिजवावे. त्यात जिरे, मिठ आणि सोडा घालून मिक्स करावे. नंतर एका कढईत तेल तापत ठेवावे. बटाट्याच्या चकत्या २ मिनिटं आधी पाण्यातून  उपसून काढाव्यात, म्हणजे बटाट्यावरचे एक्स्ट्रा पाणी भिजवलेल्या पिठात जाऊन पिठ अजून पातळ होणार नाही. तेल तापले कि बटाट्याच्या चकत्या पिठात बुडवून भजी तळून काढाव्यात. नंतर गरमागरम भजी तुम्ही सर्व्ह करू शकता. 

टॅग्स :अन्नपाऊसपाककृती