Join us  

वरण-भात, पोळीसोबत खायला करा लसणाची खमंग चटणी, तोंडाला येईल झक्कास चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 3:03 PM

Easy Peanut Garlic chutney recipe : खाकरा, पराठा, पोळीचा रोल किंवा भातासोबत एखादी चटणी असेल की जेवण मस्त होते.

भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रीयन जेवण परीपूर्ण असल्याने जगभरात या जेवणाचे कौतुक होते. महाराष्ट्रीयन जेवणात किंवा ताटात उजवी बाजू जितकी महत्त्वाची असते तितकीच डावी बाजूही महत्त्वाची असते. मीठ, लिंबू,लोणचं, चटणी, कोशिंबीर, तळण यांसारखे पदार्थ पानाच्या डाव्या बाजूला वाढले जातात. या पदार्थांना साधारणपणे तोंडी लावण्याचे पदार्थ म्हणून ओळखले जाते. आपल्या रोजच्या जेवणात हे पदार्थ आवर्जून असायला हवेत जेणेकरुन परीपूर्ण जेवण होण्यास आणि सर्व प्रकारचे आहाररस शरीरात जाण्यास मदत होते (Easy Peanut Garlic chutney recipe). 

चटणी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. खाकरा, पराठा, पोळीचा रोल किंवा भातासोबत एखादी चटणी असेल की जेवण मस्त होते. तसेच तोंडी लावायला पानात एखादी चटणी असेल की भाजी कोरडी किंवा नावडती असेल तरी फारसा फरक पडत नाही. यामध्ये दाण्याची, खोबऱ्याची, जवसाची, तिळाची, कडीपत्त्याची, लसणाची अशा बऱ्याच प्रकारच्या चटण्या करता येतात. पण आपल्याकडे प्रामुख्याने दाण्याची चटणी आवर्जून केली जाते. करायला सोपी आणि चविष्ट असलेली ही चटणी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. लसणाची दाण्याची चटणी आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असून ही चटणी नेमकी कशी करायची पाहूया...

(Image : Google)

१. एका कढईमध्ये साधारण एक ते २ चमचे तेल घ्यायचे.

२. ते चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे घालायचे. 

३. जीरे तडतडले की त्यामध्ये वाटीभर दाणे घालून ते चांगले परतायचे. 

४. यात लासणाच्या साधारण ८ ते १० पाकळ्या घालायच्या.

५. वरुन तिखट घालून शक्य असेल तर खलबत्यामध्ये ही चटणी कुटायची. 

६. कुटताना सगळ्यात शेवटी यात मीठ घालायचे. खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये ही चटणी ओबडधोबड बारीक करायची. 

७. ही चटणी वरण-भात, पोळीचा रोल, भाकरी, पराठा कशासोबतही अतिशय चविष्ट लागते.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.