स्वयंपाकघरात विविध मसाले लागतात. दिवसाची सुरुवात ज्या चहाने होते त्या चहासाठी चहा मसाला आणि फळं खाताना चाट मसाला हवा वरुन भुरभुरल्याशिवाय मजाच येत नाही. वर्तमानात हे सर्व मसाले बाहेर मिळत असले तरी किंमत जास्त आणि प्रमाण कमी अशी परिस्थिती. हेच मसाले बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरी केल्यास विकतच्या तुलनेत कमी पैशात जास्त मसाला तयार होतो आणि त्याची चवही छान जमते. हे मसाले घरीच करताना खूप व्याप करावा लागत नाही. अवघ्या दहा बारा मिनिटात चहा मसाला आणि चाट मसाला तयार करता येतो.
घरच्याघरी परफेक्ट चहा मसाला आणि चाट मसाला करण्याच्या या आहेत सोप्या कृती.
Image: Google
चहा मसाला
कडक आणि मसालेदार चहाच्या चवीसाठी चहा मसाला तयार करताना 1 ते 12 वेलची, 1 चमचा लवंगा, 1 चमचा काळे मिरे, 4 चमचे सूंठ पावडर, 4 दालचिनीचे उभे तुकडे एवढंच जिन्नस चहा मसाल्यासाठी घ्यावं लागतं. यात 1-2 जायफळांची पूड घातली तर मसाल्याला उत्तम स्वाद होतो. चहा मसाल्यातील प्रत्येक सामग्री आरोग्यासाठी उत्तम असते.
चहा मसाला करताना आधी कढई गरम करायला ठेवावी. सर्व मसाले मंद आचेवर कढईत कोरडेच भाजावेत. कढई गरम झाली की आधी मिरे भाजून घ्यावेत. ते थोडे गरम झाले की लवंगा घालाव्यात. लवंगा रम होत असतानाच वेलची भाजण्यास घालाव्यात. दालचिनीचे तुकडे थोडे बारीक करुन मग भाजण्यास टाकावेत. जायफळ घालणार असाल तर ते भाजण्याची गरज नाही. फक्त त्याचे बत्त्याने चार पाच भाग करुन घ्यावेत. सर्व मसाले बारीक आचेवर पाच ते सात मिनिटं भाजावेत.
Image: Google
भाजलेले मसाले थंड झाले की मग ते मिक्सरच्या भांड्यात टाकावेत. त्यातच जायफळाचे तुकडे आणि सूंठ पावडरही घालावी. हे सर्व मिक्सरवर बारीक करुन घ्यावं. मनासारखा चहा मसाला तयार होतो.
Image: Google
चाट मसाला
चहा मसाल्याप्रमाणेच चाट मसालाही घरच्या घरी करता येतो. हा चाट मसाला फळांवर आणि भाज्यांच्य्या सलाडवर घालून खाता येतं. हा चाट मसालाही आरोग्यासठी प्रभावी ठरतो. काळं मिठं, आमचूर पावडर यासरख्या वस्तू हमखास घरात असतात. घरी तयार केलेला चाट मसाला अधिक चवदार लागतो. फळं आणि सलाड सोडून इतर पदार्थांची चव वाढवण्यासाठीही चाट मसाल्याचा उपयोग केला जातो. हा चाट मसाला तयार केल्यावर तो खूप दिवस टिकून राहातो आणि त्याचा स्वादही छान लागतो. हा मसाला तयार करण्यासाठी लागतात फक्त तीन मिनिटं आणि तो महिनोनमहिने टिकून राहातो.
Image: Google
घरच्याघरी चाट मसाला तयार करण्यासाठी जिरे, मिरे, हिंग, सैंधव मीठ, पांढरं मीठ आणि आमचूर पावडरची गरज असते. चाट मसाला करताना सर्वात आधी नॉनस्टिक कढईत जिरे एक मिनिटभर कोरडेच भाजावेत. ते नंतर काढून ते थंड करायक्ला ठेवावेत. आता मिक्सरमधे भाजलेलें जिरे आणि काळे मिरे घालावेत. त्यानंतर बारीक पावडर बनवावी.ही पावडर चाळणीनं चाळून घ्यावी. या पावडरमधे आमचूर पावडर, काळं मीठ, पांढरं मीठ आणि हिंग घालून हा मसाला चांगला मिसळून घ्यावा. हा मसाला फ्रीजमधे किंवा एअर टाइट डब्यात बाहेर ठेवला तर हा मसाला भरपूर दिवस टिकतो. हा मसाला फळं, सलाड यासोबतच एखाद्या कोरड्या भाजीत टाकला तरी त्या भाजीला छान चव येते.
आहे की नाही चहा आणि चाट मसाला घरच्याघरी करणं अत्यंत सोपं. करुन पाहा!