हिवाळ्यात भाज्या स्वस्त मिळतात पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात याच भाज्या दुप्पट आणि तिप्पट किमतीला विकल्या जातात. तसेच त्या वाळलेल्या किंवा ओलसर मिळत असल्याने खाण्यासाठी तितक्या रुचकरही लागत नाहीत. पण हिवाळ्यात बाजारात मुबलक भाज्या आल्याने आपण त्या भरपूर खातो. याशिवाय मटारसारख्या गोष्टी साठवूनही ठेवतो. ताज्या भाज्यांचे लोणचे, मोरावळा, लिंबाचे लोणचे असे साठवणुकीचे पदार्थ या काळात करुन ठेवले जातात. त्याचप्रमाणे आपण आणखी एक गोष्ट थंडीत आवर्जून पुढच्या काही महिन्यांसाठी साठवून ठेवू शकतो ती म्हणजे मेथी. वाळवलेली मेथी म्हणजेच कसुरी मेथी बाजारातून आपण अतिशय महाग आणतो. त्यापेक्षा १० रुपयांची मेथीची जुडी विकत आणली तर घरच्या घरी ही कसुरी मेथी करुन ठेवता येऊ शकते (Easy Recipe to make kasuri methi at home).
थेपले, पुऱ्या, धिरडे, आमटी, भाजी अशा कशातही पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी आपण या कसुरी मेथीचा वापर करु शकतो. मेथी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने ती नियमित खायला हवी असं सांगितलं जातं. या मेथीत जीवनसत्वं, खनिजं आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. कसुरी मेथीत कॅल्शियम आणि लोहं चांगल्या प्रमाणात असतं. तसंच यात कर्बोदकाचं प्रमाण अतिशय कमी असतं. म्हणूनच कसुरी मेथीत असलेले हे सर्व पोषक घटक आरोग्यासाठी लाभदायक असतात. म्हणून कसुरी मेथीचा आहारात आवर्जून वापर करायला हवा. आता घरच्या घरी ही कसुरी मेथी कशी तयार करायची पाहूया..
१. मेथी निवडून पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यावी म्हणजे त्यातील माती निघून जाण्यास मदत होते.
२. ही मेथी एका जाळीत घेऊन ही जाळी गॅसवर धरायची म्हणजे त्यातला ओलावा निघून जाण्यास मदत होते. कागद किंवा कापडावर पसरुन ठेवली तरी चालते.
३. गॅसवर एक कढई ठेवून त्यात चाळणी ठेवायची आणि त्यात ही मेथीची पाने घालायची.
४. वरुन झाकण ठेवून गॅस बारीक गॅसवर काही मिनिटे मेथी चांगली परतून घ्यायची.
५. मेथी चांगली खरपूस भाजली जाते आणि मऊ असलेली ही पाने कडक म्हणजेच कुरकुरीत होतात.
६. ही कुरकुरीत पाने गार झाली की हाताने चुरून एका बरणीत भरुन ठेवायची, ती किमान ६ महिन्यापर्यंत नक्की टिकतात.