आपण स्वयंपाक करताना पदार्थांना स्वाद आणि चव येण्यासाठी विविध प्रकारचे मसाले वापरतो. यामध्ये खड्या मसाल्यासोबतच आलं, लसूण, कांदा, कडीपत्ता यांसारख्या ओल्या मसाल्याचाही आपण वापर करतो. अगदी उपमा, पोह्यापासून ते आमटी, कढीपर्यंत सगळ्याच पदार्थांना फोडणीत घालायला कडीपत्ता असेल तर पदार्थाला छान स्वाद येतो. केवळ स्वादासाठीच नाही तर पदार्थाची पौष्टीकता वाढावी म्हणूनही हा कडीपत्ता उपयुक्त असतो. तो केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेच्या सौंदर्याशी निगडीत समस्या दूर होण्यासही कडीपत्ता फायदेशीर ठरतो (Easy remedy to store curry leaves).
मायग्रेन, डोकेदुखी, डायबिटीस, थायरॉईड, तोंडाचा अल्सर, वजन कमी करणे, हार्मोन्सचे असंतुलन अशा विविध समस्यांवर कडीपत्ता उपयुक्त असतो. पण बाजारातून कडीपत्ता आणला की तो फारतर २ दिवस ताजा राहतो आणि लगेचच सुकतो. एकदा कडीपत्ता वाळून गेला की त्याचा वास जातो आणि तो अजिबात चांगला लागत नाही. पण हा कडीपत्ता वाळू नये आणि जास्तीत जास्त दिवस चांगला राहावा यासाठी तो स्टोअर करण्याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे किमान ५ ते ६ महिने आपण हा कडीपत्ता वापरु शकतो.
१. कडीपत्त्याची पाने काढून तो स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा.
२. एका डिश पसरून साधारण ३० सेकंद गरम करायचा आणि बाहेर काढून पुन्हा हाताने पसरायचा.
३. ही सेम प्रक्रिया २ ते ३ वेळा करायची. जेणेकरून कडीपत्ता पूर्णपणे कोरडा होण्यास मदत होते.
४. कडीपत्ता कुरकुरीत झाल्यावर तो एका झिप लॉकच्या बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवावा.
५. या वाळलेल्या कडीपत्त्याची पावडर करून तीही एका बरणीत भरून ठेवता येऊ शकते. भाजी, आमटीला ही पावडर वापरणेही सोयीचे असते.
६. याच पद्धतीने पुदिना किंवा कोथिंबीरही ५ ते ६ महिने साठवून ठेवता येऊ शकते.