Join us  

शाळेतून आल्यावर मुलांना दणकून भूक लागते? पोटभरीचे झटपट होणारे ३ पर्याय, मुलंही होतील खूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 12:36 PM

Easy Still Healthy Evening Snacks Recipes for Kids : संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी वेगळं-चविष्ट काहीतरी काय द्यायचं याविषयी...

सकाळची शाळा असेल तर दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत मुलं घरी येतात आणि व्यवस्थित जेवतात. पण दुपारची शाळा असेल किंवा दुपारी ३ किंवा ४ अशा वेळेला शाळा सुटत असेल तर मुलांना दुपारचे जेवण करुन बराच वेळ झालेला असतो. शाळेतून घरी येण्यासाठी लागणारा वेळ, शाळेतून निघताना इतर मुलांसोबत केलेला दंगा यांमुळे त्यांना घरी आल्यावर दणकून भूक लागलेली असते. अशावेळी मुलांना काय खायला द्यायचं असा प्रश्न आपल्यासमोर असतो. अशावेळी मुलांना काहीतरी चटपटीत आणि तरीही पोटभरीचे असे पर्याय हवे असतात. या मधल्या वेळेला पालकांपैकी कोणी घरी असतेच असे नाही. मग मुलांना खायला काय द्यायचं असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. अशावेळी मुलांना झटपट खाता येतील असे पर्याय घरात असतील तर ते खूश होतात. पाहूयात असे पर्याय कोणते (Easy Still Healthy Evening Snacks Recipes for Kids) ...

१. इंस्टंट भेळ

आपण घरात भडंग, लाह्यांचा चिवडा, मखाण्याचा चिवडा असे काही विकेंडला करुन ठेवले तर मुलांना ते झटपट घेऊन खाता येते. यावर घालण्यासाठी कांदा-टोमॅटो, कोथिंबीर, कैरी, काकडी असे चिरुन ठेवले तर थोडा चाट मसाला, शेव घालून मुलं ही भेळ ऐनवेळी खाऊ शकतात. यावर सॅलेड घेतल्याने ते ओलसर आणि पोटभरीचे होण्यास मदत होते. सध्या बाजारात ज्वारीच्या, नाचणीच्या अशा विविध प्रकारच्या लाह्या मिळतात. याशिवाय चुरमुरे, भाजके पोहे, पातळ पोहे याचा चिवडा आपण एरवीही करतोच. यामध्ये दाणे, खोबरं घातल्यास त्याची चव आणि पौष्टीकताही वाढण्यास मदत होते. 

(Image : Google)

२. कडधान्याची मिसळ

आपण साधारणपणे जेवणात उसळ करतो. पण त्यापेक्षा डब्याला फळभाजी किंवा पालेभाजी केली आणि उसळ ही मुलांना ६ वाजताच्या खाण्यासाठी करुन ठेवली तर मुलांना ती आवडते. यामध्येही आपण फरसाण, शेव घालू शकतो. यावर घेण्यासाठीही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असे फ्रिजमध्ये चिरुन ठेवल्यास मुलं मिसळसारखे हे आवडीने खाऊ शकतात. यामध्येही पौष्टीकता वाढण्यासाठी उकडलेले दाणे, लिंबाचा रस असे आणखी काही घालू शकतो. 

(Image : Google)

३. सँडविच

सँडविच हा करायला सोपा आणि झटपट होणारा प्रकार आहे. १ चटणी आणि सॅलेड चिरुन ठेवल्यास मुले हाताने करुनही घेऊ शकतात. यामध्ये पौष्टीकता वाढण्यासाठी चीज, पनीर आणि जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करावा. ब्रेड नको असेल तर पोळीचेही सँडविच अतिशय छान लागते. यावर मिरपूड किंवा मिक्स्ड हर्बस घातल्याने त्याला विकतच्या सँडविचसारखी छान चव येते. 

टॅग्स :अन्नलहान मुलंपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पालकत्व