थंडीच्या दिवसांत आपल्याला सकाळी उठल्यावरच भूक लागते. बाहेर गारठा असल्याने सतत गरमागरम काहीतरी खावसं वाटत असतं. अशावेळी सकाळच्या घाईत रोज नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न महिला वर्गापुढे असतोच. पोहे, उपीट, साबुदाण्याची खिचडी हे करुन आणि खाऊन कंटाळाही आलेला असतो. अशावेळी नाश्त्याला करता येतील असे काही खास सोपे पर्याय आपल्याला सुचत नाहीत. म्हणूनच थंडीमध्ये शरीराला ऊर्जा देणारे आणि चविष्ट असे ३ पर्याय आज आपण पाहणार आहोत (Easy Still Teasty Breakfast Recipe Options for Winter).
१. नाचणीचे आंबील
थंडीत सतत गरम काहीतरी प्यावसं वाटतं. मग आपण चहा किंवा कॉफी घेतो. मात्र त्यापेक्षा नाचणीचे गरमागरम आंबील घेतले तर ताकदही येते आणि शरीराचे पोषण होण्यासही मदत होते. नाचणीच्या पीठात ताक, तिखट, मीठ, साखर आणि पाणी घालून हे पीठ चांगले पातळसर एकजीव करुन घ्यायचे. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जीरं, हिंग, कडीपत्ता आणि भरपूर लसणाच्या पाकळ्या घालायच्या. त्यात हे पीठ घालून चांगले शिजवून घ्यायचे. गरमागरम आंबील प्यायलाही मस्त लागते आणि पोटही भरते.
२. भाज्यांचा दलिया
थंडीच्या दिवसांत बाजारात बऱ्याच भाज्या मिळतात. अशावेळी आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवायला हवे. गव्हाचा दलिया बाजारात सहज मिळतो किंवा आपणही गहू थोडे जाडसर दळून आणू शकतो. हे गहू कुकरला शिजवून मग घरात उपलब्ध असतील अशा कोबी, फ्लॉवर, फरसबी, गाजर, मटार अशा भाज्या घालून केलेला दलिया चविष्ट तर लागतोच आणि पोषण देणाराही ठरतो.
३. पनीर पराठा
पनीर हे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आपण सकाळी पोळ्यांसाठी कणीक भिजवतोच. यामध्येच थोडी जास्त कणीक भिजवायची. पनीर किसून त्यामध्ये आलं-मिरची-लसूण पेस्ट, धणे-जीरे पावडर मीठ आणि लिंबू-कोथिंबीर घालायचे. हे स्टफींग पोळीच्या कणकेत भरुन त्याचा पराठा लाटायचा. तूप किंवा तेलावर हा पराठा खरपूस भाजून गरमागरम खायला घ्यायचा.