Join us  

वरण-भातासोबत तोंडी लावायला ५ मिनीटांत करा कुरकुरीत सुरणाचे, वांग्याचे काप, जेवण होईल झक्कास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 5:18 PM

Easy Suran Kap Recipe : भरपूर पोषण देणारी सोपी झटपट रेसिपी नक्की ट्राय करा...

दुपारी आपण डब्यात सहसा पोळी-भाजी नेतो. भात डब्यात गार होत असल्याने डब्यासाठी आपण भात नेतोच असे नाही. मात्र रात्रीच्या जेवणासाठी बरेचदा आपल्याकडे वरण-भात किंवा आमटी-भात केला जातो. वरण-भात किंवा गरम वाफाळता आमटी-भात याच्यासारखं सुख जगात दुसऱ्या कोणत्याही महागड्या पदार्थांत नाही असं आपण अनेकदा ऐकतो किंवा अनुभवतोही. पण नुसता भात वरण खाण्यापेक्षा त्याच्यासोबत तोंडी लावायला काहीतरी छान असेल तर जेवण आणखी चविष्ट होतं. मग कधी आपण एखादी छानशी कोशिंबीर करतो किंवा कधी नुसतीच चटणी, लोणचं किंवा पापड घेतो. मात्र अगदी ५ मिनीटांत होणारे, चविष्ट लागणारे आणि भरपूर पोषण असलेले सुरणाचे किंवा वांग्याचे काप केले तर हेच साधंसुधं जेवण आणखी मस्त होऊ शकतं. हे काप पोळीसोबतही छान लागतात. कच्ची केळी, बटाटा अशा कशाचेही केले तरी जेवणाची रंगत वाढते. आता हे काप कसे करायचे ते पाहूया (Easy Suran Kap Recipe).

साहित्य -

१. सुरण/वांगी किंवा कच्ची केळी/ बटाटा - पाव किलो 

२. बारीक रवा - अर्धी वाटी 

(Image : Google)

३. तांदळाचे पीठ - पाव वाटी 

४. तिखट - अर्धा चमचा 

५. पिठीसाखर - अर्धा चमचा 

६. मीठ - चवीनुसार 

७. तेल - अर्धी वाटी  

कृती - 

१. सुरण असेल तर ते नीट साफ करुन त्याचे पातळ काप करुन कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्यायची. वांगी, केळी किंवा बटाटा असेल तर कच्चे असतानाच फक्त पातळ काप करायचे. 

२. एका डीशमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करायचे. 

३. यामध्ये मीठ, तिखट आणि पिठीसाखर घालून एकजीव करायचे. 

४. सुरणाचे अर्धवट उकडलेले किंवा वांग्याचे, बटाट्याचे काप यामध्ये घोळवायचे.

५. पॅनमध्ये तेल घालून त्यावर हे काप दोन्ही बाजूने खरपूस शॅलो फ्राय करायचे. 

६. गरमागरम हे कुरकुरीत काप जेवणाची रंगत वाढवतात आणि शरीराचेही पोषण करणारे ठरतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.