दिवाळी म्हणजे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण. दिव्यांचा हा सण आपल्या आयुष्यात दिव्यासारखा प्रकाश आणि रांगोळीच्या रंगांप्रमाणे विविधता घेऊन येतो. हा सण साजरा करायचा तर आपल्या जवळची माणसं आपल्यासोबत हवीच. दिवाळीचे ४-५ दिवस एकमेकांकडे जेवणाचे बेत ठरतात आणि मग नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, ऑफीसमधले लोक असे सगळे मिळून काही ना काही बेत ठरतोच. यानिमित्ताने आपल्या घरी कोणी येणार असेल तर जेवायला काय करायचे असा प्रश्न तमाम महिलांना असतो (Easy tasty chole recipe for diwali special).
झटपट होईल, सगळ्यांना आवडेल आणि तरीही पोटभरीचे, हेल्दी असे पर्याय आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात. पण नेहमीचे तेच तेच इडली, पराठा, पावभाजी, मिसळ हे प्रकार आपल्याला नको असतात. अशावेळी छोले पुरी हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आपण नक्कीच करु शकतो. फारसा वेळ न लागणारा हा पदार्थ चमचमीत असल्याने गोड खाऊन कंटाळा आला असेल तरी चांगला पर्याय ठरु शकतो. पाहूयात छोले पुरी परफेक्ट उत्तर भारतीय पद्धतीने करायची तर नेमकं काय करायचं. जास्त मसाले न घालताही हे छोले चविष्ट करता येतात. पाहूयात त्याचीच सोपी रेसिपी...
१. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आदल्या दिवशी रात्री छोले पाण्यात भिजत घालायचे.
२. कुकरमध्ये २ चमचे तेल आणि १ चमचा तूप घालून ते चांगले गरम झाले की त्यामध्ये २ तमालपत्र आणि १ इंच दालचिनी घालायची.
३. नंतर यामध्ये ७ ते ८ काळी मिरी, एका वेलचीतील दाणे, २ ते ३ लवंगा, चक्रीफूल घालून हे सगळे चांगले परतून घ्यायचे.
४. मग यामध्ये २ चमचे धणे पावडर, १ चमचा जीरे पावडर, २ बारीक चिरलेले टोमॅटो, कांदा आणि १ मोठा चमचा आलं-लसूण-मिरची पेस्ट घालून हे सगळे पुन्हा चांगले परतायचे.
५. परतल्यानंतर यामध्ये १ चमचा कसुरी मेथी आणि १ चमचा लाल तिखट, गरम मसाला, हळद घालायचे.
६. दुसरीकडे एका कुकरमध्ये भिजवलेले छोले पाणी काढून त्यात मीठ आणि थोडासा सोडा घालून शिजवायला लावायचे. साधारण २ ते ३ शिट्ट्यांमध्ये छोले छान मऊ शिजतात.
७. शिजलेले छोले या मसाल्यामध्ये घालायचे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ, ॉचवीपुरता गूळ आणि थोडे पाणी घालून पुन्हा एक शिट्टी आणायची.
८. छोले शिजवून घातल्याने ते एकसारखे शिजण्यास मदत होते. तसेच मसाला यामध्ये चांगला मुरतो आणि छोले आणि मसाला एकजीव होतात.
९. कुकरचे झाकण पडल्यावर यामध्ये वरुन हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि आवडीनुसार लिंबू पिळायचे.
१०. ही गरमागरम छोल्यांची उसळ पोळी, पुऱ्या, भटुरा, फुलके, रोटी कशासोबतही तितकीच छान लागते.