Join us  

दिवाळीत पाहुणे आल्यावर १० मिनिटांत करा-लग्नाच्या पंगतीसारखा मोकळा चविष्ट मसालेभात, घ्या सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 2:33 PM

Easy Tasty Masalebhat Recipe : मसालेभात परफेक्ट मोकळा आणि चविष्ट व्हावा यासाठी नेमके काय करायचे ते समजून घेऊया.

लग्नाच्या पंगतीत आपण २ पदार्थांवर दणकून ताव मारतो. मसालेदार भाज्या, तेलकट पुऱ्या यांतील काहीही आवडले नाही तरी गोड आणि मसालेभात हे सगळ्यांना आवडणारे पदार्थ असतात. हाच मसालेभात आपण घरी करायचा म्हटला तर तो आपल्याला पंगतीसारखी जमत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तांदळाचा प्रकार, मसाल्यांचे आणि पाण्याचे प्रमाण हे असते. पण दिवाळीच्या दिवसांत आपल्याकडे पाहुणे येणार असतील आणि सोपे, सुटसुटीत काही करायचे असेल तर मसालेभात हा मस्त पर्याय असतो. गरमागरम मसालेभात, त्यावर खोबरं आणि कोथिंबीर, सोबतीला थोडेसे तळण आणि ताक किंवा मठ्ठा हा मेन्यू नुसता ऐकला तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हा मसालेभात परफेक्ट मोकळा आणि चविष्ट व्हावा यासाठी नेमके काय करायचे ते समजून घेऊया. कोणतीही रेसिपी करताना काही गोष्टी लक्षात घेतल्यास ती रेसिपी परफेक्ट व्हायला मदत होते (Easy Tasty Masalebhat Recipe). 

साहित्य - 

१. तांदूळ - २ वाट्या (भात मोकळा होईल असा कोणताही बासमती, कोलम इ.)

२. खडा मसाला - अंदाजे 

३. गोडा मसाला - १ चमचा 

४. तिखट - अर्धा चमचा 

५. हळद - अर्धा चमचा 

६. तेल - २ चमचे 

(Image : Google )

७. मोहरी, जीरं - अर्धा चमचा 

८. कांदा - २ लहान 

९. टोमॅटो - २ लहान 

१०. बटाटा - १ 

११. मटार - अर्धी ते पाऊण वाटी

१२. तूप - २ चमचे

१३. आलं-लसूण पेस्ट - १ चमचा 

१४. मीठ - चवीनुसार

कृती - 

१. कढईत तेल घालून त्यात मोहरी, जीरं आणि दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, वेलची असे उपलब्ध असतील ते खडे मसाले घालायचे. 

२. यामध्ये आलं-लसूण पेस्ट उभा चिरलेला कांदा, चौकोनी चिरलेला टोमॅटो आणि बटाटा, मटार घालून सगळे चांगले परतून घ्यायचे. 

३. नंतर यामध्ये हळद, तिखट, गोडा मसाला घालून सगळे चांगले परतून घ्यायचे. 

४. यामध्ये धुतलेले तांदूळ घालून तांदूळाच्या दुप्पट पाणी घालायचे. म्हणजे आपण २ वाटी तांदूळ घेतले तर त्याच वाटीने मोजून ४ वाटी पाणी घालायचे. 

५. यामध्ये चवीनुसार मीठ घालून चांगली उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. 

६. नंतर गॅस बारीक करुन कढईवर झाकण ठेवायचे आणि १५ ते २० मिनीटे भात चांगला शिजू द्यायचा. 

७. भात शिजत आला असे वाटले की कढईत कडेने तूप सोडायचे आणि भात एकदा हलवून पाहायचा. तुपामुळे भात जास्त मोकळा होण्यास मदत होते. 

८. गरमागरम मसालेभात ताटलीत घेऊन त्यावर खोबरं-कोथिंबीर आणि आवडत असेल तर पुन्हा वरुन तूप घालायचे आणि भाताचा आस्वाद घ्यायचा.  

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.