Join us  

ज्वारीच्या पिठाचं करा खमंग थालीपीठ, पोटभर-पौष्टिक आणि १० मिनिटांत करता येईल असा चमचमीत नाश्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 10:50 AM

Easy Thalipit recipe for breakfast : ऐनवेळी झटपट करता येईल असा नाश्त्याचा चविष्ट पर्याय...

नाश्त्याला रोज वेगळं आणि तरीही चविष्ट असं काय करायचं असा प्रश्न पडतो. पोहे, उपमा, इडली, शिरा, खिचडी यांबरोबरच थालीपीठ हा आणखी एक चविष्ट पदार्थ. पोटभरीचा आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन असलेला हा पदार्थ अनेकांचा विक पॉईंट असतो. भाजणीचे खमंग थालीपीठ, त्यावर लोण्याचा गोळा आणि सोबत दही हे कॉम्बिनेशन जगभरात प्रसिद्ध आहे. विविध धान्ये आणि डाळी वापरुन केले जाणारे हे थालीपीठ चवीला तर छान लागतेच पण पोटभरीचे असल्याने नाश्त्यासाठी किंवा एखाद्या जेवणासाठी हा उत्तम पर्याय असतो. पण भाजणी करायला वेळ नसेल किंवा विकत आणलेली भाजणी संपली असेल तर घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पिठांपासून आपण अगदी भाजणीसारखेच खमंग थालीपीठ करु शकतो. हे थालीपीठ भाजणीचे नाही असे आपल्याला कोणी सांगितले नाही तर कळणारही नाही इतके छान होते. पाहूयात यासाठी नेमके कोणते जिन्नस वापरायचे (Easy Thalipit recipe for breakfast)...

साहित्य - 

१. ज्वारीचे पीठ - २ वाटी

२. गव्हाचे पीठ - अर्धी वाटी

३. डाळीचे पीठ - अर्धी वाटी

(Image : Google )

४. तांदळाचे पीठ - अर्धी वाटी

५. बारीक चिरलेला कांदा - १ वाटी

६. कोथिंबीर - अर्धी वाटी 

७. धणे-जीरे पावडर - १ चमचा 

८. तिखट - १ चमचा 

९. हळद - अर्धा चमचा 

१०. मीठ - चवीनुसार 

११. तेल - अर्धी वाटी

कृती - 

१. सगळी पीठं एकत्र करायची आणि त्यामध्ये कांदा घालायचा. 

२. यामध्ये धणेजीरे पावडर, हळद, तिखट, मीठ घालून वरुन कोथिंबीर घालायची. 

३. अंदाजे थोडे थोडे पाणी घालून थालिपीठाला भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवायचे. 

४. हाताला तेल लावून पीठाचा एक गोळा हातावर घ्यायचा.

(Image : Google )
 

५. शक्य असेल तर थेट तव्यावर नाहीतर सुती कापडावर हाताने थालीपीठ थापून घ्यायचे. 

६. हे थालीपीठ तव्यावर घालायचे आणि मध्यभागी थालिपीठाला होल पाडून त्यामध्ये तेल घालायचे. 

७. मध्यम आचेवर झाकण ठेवून थालीपीठ दोन्ही बाजुने खमंग भाजून घ्यायचे. 

८. थालीपीठ ताटात काढल्यावर त्यावर आवडीनुसार तूप, लोणी, बटर घालायचे आणि दही, लोणचे यांसोबत गरमागरम थालीपीठ खायचे. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.