Join us  

पराठे लाटताना फाटतात, सारण बाहेर येतं? परफेक्ट पराठ्यांसाठी शेफ सांगतात खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 11:45 AM

Easy Tips for making Stuff Paratha by Pankaj Bhadouria : पराठा फसायला नको म्हणून काय करायचं याविषयी

ठळक मुद्देपराठा जोरात लाटला तर याचे आतले स्टफींग इकडून तिकडे जाते आणि पराठा फाटण्याची शक्यता असते.नाश्त्याला किंवा जेवायला, ट्रीपला जाताना सोबत न्यायला पराठा ही अतिशय चांगला पर्याय असतो.

पोळ्या, पुऱ्या किंवा अगदी भाकरी करणंही एकवेळ सोपं पण पराठे करायचं म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं. त्यातलं सारण फाटून बाहेर येईल की काय, पराठा पोळपाटाला चिकटला तर काय करायचं, कितीही पीठ घातलं तरी तो लाटलाच जात नाही अशा एक ना अनेक समस्या आपल्याला पराठा लाटताना येतात. नाश्त्याला किंवा जेवणाला आपण आवर्जून आलू पराठा, पनीर पराठा किंवा आणखी कसले स्टफ पराठे करतो. पोटभरीचा आणि हेल्दी असणारा हा गरमागरम पराठा तूप घालून तर कधी दही किंवा लोणचं, सॉस अशा कशासोबतही अगदी छान लागतो. हे खरं असलं तरी हा पराठा फसायला नको म्हणून काय करायचं याविषयी प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया ‘पंकज के नुक्से’ मध्ये काही खास टिप्स देतात. सोशल मीडियावर त्या बऱ्याच अॅक्टीव्ह असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांना सतत काही ना काही सोप्या टिप्स देत असतात (Easy Tips for making Stuff Paratha by Pankaj Bhadouria) . 

१. सुरुवातीला कणकेचा गोळा घेऊन तो थोडा लाटून घ्यायचा. त्यामध्ये पनीर, बटाटा किंवा आणखी कोणते सारण असेल ते भरायचं.

२. मोदकाला आपण ज्याप्रमाणे सगळ्या बाजूने कडा घेऊन बंद करतो त्याचप्रमाणे या पारीच्या सगळ्या बाजू व्यवस्थित एकत्र करायच्या आणि त्याचा छान गोल करुन घ्यायचा.

३. दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये हा गोल अलगद दाबून त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं. त्यानंतर एका हातात हा पराठ्याचा गोळा धरुन दुसऱ्या हाताच्या चिमटीने पराठ्याच्या कडा हलक्या दाबायच्या. 

४. त्यानंतर हा गोळा पोळपाटावर ठेवायचा. आता पराठ्याचा मधला वरती आलेला भाग आपल्या तळव्याने हलकाच दाबायचा. मग बोटांनी सगळीकडे एकसारखे हलके दाबून पराठा पसरेल असे पाहायचे. 

५. आता अर्धा पराठा तयार झालेला असल्याने अर्धाच पराठा हलका लाटून घ्यायचा. जोरात लाटला तर याचे आतले स्टफींग इकडून तिकडे जाते आणि पराठा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे पराठा हलक्या हाताने थोडा जाडसरच लाटावा.  

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.