भाजी आमटीला फोडणी देताना आपण सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घालतो. कधी कधी आपला अंदाज चुकतो आणि तेल चुकून जास्त पडते. काही वेळा वाटण आणि मसाले घातल्यावर याला आणखी तेल सुटते. मग आपण भाजी करतो खरी पण नंतर त्यावर तेलाचा तवंग येतो. भाजीवर तेल आले की आपल्याला तेलकट भाजी खायला नको वाटते. इतके तेल पोटात जाणे आरोग्यासाठीही चांगले नसते. अनेकदा अशी तेलकट भाजी घशाशी आल्यासारखे होते, छातीत जळजळते, तेलामुळे कोलेस्टेरॉल वाढते, वजन वाढते ते वेगळेच. त्यामुळे भाजीला चुकून तेल जास्त पडले तर ते काढून टाकण्यासाठी नेमके काय करायचे याच्या काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत (Easy Tips to get rid of Excess Oil from Sabji Bhaji) .
१. भाजी फ्रिजमध्ये ठेवा
भाजीला चुकून तेल जास्त झालं तर ती भाजी फ्रिजमध्ये ठेवायची. यामुळे तेल भाजीच्या वर जमा होते आणि फॅटस असल्याने ते थंडावा लागला की आपोआप घट्टसर होते. तेल पातळ असेल तर ते ग्रेव्हीपासून वेगळे करणे अवघड जाते. पण फ्रिजमध्ये ठेवल्यावर ते घट्ट होत असल्याने चमचा किंवा डावाने काढून टाकणे शक्य होते.
२. बर्फाच्या खड्यांचा करा वापर
ग्रेव्हीमधील जास्तीचे तेल काढून टाकण्यासाठी आपण बर्फाच्या खड्यांचाही वापर करु शकतो. यासाठी हे तुकडे ग्रेव्हीमध्ये टाकावेत. यामुळे नकळत तेलाचे फॅटस या खड्यावर चिकटले जातील. मग हे खडे बाहेर काढले की आपोआप फॅटस म्हणजेच तेल बाहेर निघून यायला मदत होईल.
३. टिश्यू पेपर
भाजीच्या ग्रेव्हीवर तेल तरंगत असेल तर अतिशय अलगदपणे त्यावर टिश्यू पेपर घालून बाहेर काढावा. यामुळे वरवर असलेले जास्तीचे तेल त्यामध्ये शोषले जाते आणि भाजीवरचे तेल कमी होण्यास मदत होते.
४. ब्रेड
ब्रेडमध्ये एखादी द्रव गोष्ट शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. म्हणूनच आपण मटार उसळ, मिसळ यांच्यासोबत ब्रेड खातो. ब्रेडचा स्लाईस भाजीवर टाकला आणि तो बाहेर काढला तर वर आलेले तेल टिश्यू पेपरप्रमाणे त्यामध्ये शोषले जाण्यास मदत होते.