उन्हाळ्यात भाजी आणि फळांची किंमत वाढत जाते. हिवाळ्याच्या दिवसांत अगदी ५ ते १० रुपयांना मिळणाऱ्या भाज्या उन्हाळ्यात मात्र २० रुपयांच्या खाली मिळत नाहीत. शेतकऱ्यांकडे भाजीपाला साठवण्याची पुरेशी सोय नसल्याने आणि आवक उन्हाळ्यात कमी होत असल्याने किमती झपाट्याने वाढतात. व्हिटॅमिन सीचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या लिंबाला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मागणी असते. सरबत करण्यासाठी आणि इतरही गोष्टींसाठी लिंबू उन्हाळ्यात आवर्जून खायला सांगितले जाते. कॅलरी बर्न होण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचा उपाय अनेक जण करतात. इतकेच नाही तर हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर लिंबू अतिशय फायदेशीर ठरते (Easy Trick for How to Store Lemons for 6 Months).
कधी सॅलेडवर, कधी कोशिंबीरीत तर पोहे, उपीट यांवर आपण आवर्जून लिंबू पिळून घेतो. उन्हाळ्यात मात्र हे लिंबू लगेचच वाळून जाते. वाळू नये म्हणून आपण हे लिंबू इतर भाज्यांप्रमाणे फ्रिजमध्येही ठेवू शकत नाही. कारण फ्रिजमध्ये ते खूप कडक होते आणि काही काळाने तुरट लागते. अशावेळी पैसे तर वाया जातातच पण लिंबूही वाया जाते. पण लिंबू साठवून ठेवण्याची योग्य पद्धत आपल्याला माहित असेल तर? पाहूयात लिंबू जास्त दिवस टिकावे आणि लगेच वाळून जावू नये यासाठी आळशीहॅक्स (Alshihacks) या इन्स्टाग्राम पेजवर एक अतिशय सोपी हॅक सांगण्यात आली आहे. ही हॅक कशी करायची पाहूया...
१. लिंबं बाजारातून आणल्यावर ती स्वच्छ धुवून घ्या
२. त्यानंतर हाताला स्वयंपाकाचे तेल लावून ते हात लिंबावरुन चोळून घ्या म्हणजे लिंबाच्या आवरणाला तेल लागेल.
३. मग एका डब्यात किंवा बरणीमध्ये ही सगळी लिंबं ठेवून ही बरणी किंवा डबा फ्रिजरमध्ये ठेवा. किमान ६ महिने लिंबं जशीच्या तशी राहतील.
४. जेव्हा लिंबू वापरायचे असेल तेव्हा यातून १ लिंबू काढा आणि ते एका भांड्यात किंवा ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात घालून ठेवा.
५. फ्रिजरमुळे एकदम दगडासारखे कडक झालेले हे लिंबू पाण्यात घातल्यावर काही मिनिटांत मऊ पडेल.
६. त्यानंतर हे लिंबू कापून त्याचा रस तुम्ही नेहमीप्रमाणे वापरु शकता.