सणवार असले किंवा अगदी चतुर्थीचा उपवास सोडायचा असला की आपण पोळ्या करण्यापेक्षा पुऱ्या करतो. इतकंच काय पण पोळ्या खाऊन कंटाळा आला की विकेंडला किंवा एरवीही गरमागरम पुरी भाजीचा बेत केला जातो. पुऱ्या म्हटल्या की ओघाने तेलही आलेच. पुऱ्यांना खूप तेल लागते म्हणून पुऱ्या खाण्यापेक्षा पोळ्या खाण्यालाच अनेक जण पसंती देतात. तेलाने कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि पर्यायाने हृदयाला धोका उद्भवण्याची शक्यता असते. तसेच तेलामुळे लठ्ठपणाही वाढतो, म्हणून पुऱ्या खाणे टाळणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात (Easy trick of Zero Oil non fried Puri ).
पुऱ्या खायला छान लागतात मात्र आरोग्याला त्रास होऊ नये म्हणून आवडीवर निर्बंध घालावे लागतात. असे होऊ नये आणि मनसोक्त पुऱ्या खाता याव्यात यासाठी आज आपण एक सोपी ट्रीक पाहणार आहोत. कणभरही तेल न वापरता पुऱ्या तळण्याची एक खास पद्धत आज आपण पाहणार आहोत. यामुळे पुऱ्या खायचा आनंदही घेता येतो आणि तेलही शरीरात जात नाही. ही पद्धत नेमकी काय आहे ते पाहूया...
१. नेहमीप्रमाणे पुऱ्यांसाठी घट्टसर कणीक मळून घ्यायची. ही कणिक मळताना यामध्ये थोडे दही घालायचे.
२. मळलेली कणीक अर्धा तासासाठी झाकून ठेवायची म्हणजे ती चांगली मुरते.
३. त्यानंतर नेहमीप्रमाणे मध्यम आकाराच्या थोड्या जाडसर पुऱ्या लाटून घ्यायच्या
४. मग गॅसवर एका पातेल्यात किंवा कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचे आणि त्या उकळलेल्या पाण्यात पुरी २ ते ३ मिनीट पुरी घालून ती चांगली उकडून घ्यायची.
५. पुरी या पाण्यावर तरंगायला लागली की ती पाण्यातून बाहेर काढायची.
६. या पुऱ्या फुगण्यासाठी एअर फ्राय करायच्या, त्यासाठी आपल्याकडे एअर फ्रायर असणे आवश्यक आहे.
७. एअर फ्रायरमध्ये साधारणपणे ४ मिनीटांमध्ये या तळलेल्या पुऱ्याप्रमाणे अतिशय परफेक्ट टम्म फुगतात.
८. अशाप्रकारे तळलेल्या पुऱ्या न खाता या पुऱ्या खाऊन आपण मनसोक्त पुऱ्या खाऊ शकतो.