Join us  

मशरुम साफ करण्याची पाहा सोपी आणि योग्य पद्धत; इन्फेक्शन होणार नाही, मिळेल पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2024 12:03 PM

Easy Way to clean Mushrooms cooking tips : हे मशरुम साफ करणे एक जिकरीचे काम असते.

आपण नियमितपणे मशरुम खात नसलो तरी कधीतरी आवर्जून मशरुम आणतो. मशरुम सूप, मशरुमची भाजी, मशरुम सॅलेड यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने हे मशरुम आणले जातात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन डी, सेलेनियम बिटा केरोटीन, पोटॅशियम, फायबर यांसारखे आरोग्याला उपयुक्त घटक असतात. १०० ग्रॅम मशरुममध्ये ३ ग्रॅम प्रोटीन असतात. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तसेच हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठीही मशरुमचा आवर्जून आहारात समावेश करण्यास सांगितले जाते. पास्ता, पिझ्झा यांसारख्या जंक फूडच्या पदार्थांमध्येही पोषकता वाढवण्यासाठी मशरुमचा आवर्जून वापर केलेला असतो (Easy Way to clean Mushrooms cooking tips). 

पण हे मशरुम साफ करणे एक जिकरीचे काम असते. मशरुम मातीत येत असल्याने ते पूर्णत: मातीने भरलेले असतात. पालेभाजी ज्याप्रमाणे पूर्ण नीट साफ केल्याशिवाय खाऊ नये असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे मशरुमवरही बरेच विषाणू असल्याने त्यातून आपल्याला इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते, त्यामुळे मशरुम नीट साफ करुन मगच खायला हवेत. हे मशरुम नीट साफ न करता खाल्ले तर आरोग्याला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच हे मशरुम योग्य पद्धतीने साफ कसे करायचे याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. पाहूयात मशरुम साफ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत... 

(Image : Google)

१. मशरुम एका चाळणीत घ्यावेत.

२. कोरड्या मशरुमवर थोडे पीठ आणि मीठ घालावे.

३. मग प्रत्येक मशरुम हातात घेऊन पीठ आणि मीठ मशरुमवर नीट चोळून घ्यावे.

४. त्यानंतर पाण्याने हे मशरुम थोडे ओले करुन ते हाताने स्वच्छ धुवावेत.

५. यानंतरही मशरुम नीट स्वच्छ झाले नाहीत असे वाटले तर थोडे आणखी पीठ घालावे आणि मशरुम पुन्हा थोडे चोळून वाहत्या पाण्याखाली धुवावेत.

६. मग हे मशरुम एका सुती कपड्यावर टाकून चांगले सुकवावेत आणि मग त्याची भाजी किंवा सूप करावे.  

टॅग्स :अन्नस्वच्छता टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.