Join us  

रेस्टाॅरण्टस्टाइल 'शाही पनीर मसाला' घरच्या घरीच करायची सोपी कृती, करा पनीरचे चमचमीत प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 5:59 PM

रेस्टाॅरण्ट स्टाइल शाही पनीरसाठी विकतचा मसाला कशाला? शाही पनीर मसाला करा घरच्याघरी

ठळक मुद्देघरच्याघरी शाही पनीर मसाला करण्याच्या दोन पध्दती आहेत. शाही पनीर मसाल करण्यासाठी टमाटा पावडर लागते. ती घरी करता येते किंवा तयारही उपलब्ध असते. पण टमाटा पावडर नाही वापरली तरी मसाला छान होतो. घरी तयार केलेला शाही पनीर मसाला भरपूर काळ टिकतो.

सणावाराला/ कोणी पाहुणे येणार असतील तर/ घरगुती पार्टी असल्यास किंवा नेहमीच्या भाज्यांना कंटाळून काहीतरी वेगळं करण्याचा विचार येतो तेव्हा मनात पहिला पर्याय पनीरचाच येतो. वेगळी भाजी म्हणजे पनीरची भाजी. रेस्टाॅरण्टसारखी पनीर भाजी घरी करण्यासाठी इतर सर्व साहित्यासोबत खास शाही पनीरसाठी पनीर मसाला हा हवाचं.  घरातला शाही पनीर मसाला संपला आहे म्हणून गरम मसाला टाकल्यास भाजीची चव जाते. अशा वेळेस घरी पनीर मसाला नाही म्हणून शाही पनीरचा बेत रद्द करण्याची वेळ अनेकांवर बऱ्याचदा येते.पण घरच्याघरी पनीर मसाला करणं सहज सोपं आहे. यासाठी विकतच्या मसाल्यावर अवलंबून राहाण्याची अजिबात गरज नाही. आपल्या हातानं तयार केलेल्या मसाल्यानं शाही पनीरची चव आणखी वाढेल हे मात्र नक्की!

Image: Google

कसा करायचा शाही पनीर मसाला?

शाही पनीर मसाला करण्यासाठी 10 सुक्या लाल मिरच्या, 5-7 वेलची, 8-9 लवंगा, 1 छोटा चमचा जिरे, 8-9 मोठी वेलची, 3-4 दालचिनी तुकडे, 3 मोठे चमचे धणे, 2 चक्रफूल, 1 इंच जायफळ, 1 चमचा टमाटा पावडर, 10-12 काळे मिरे घ्यावेत. 

Image: Google

मसाल्यासाठी टमाटा पावडर आधी घरी करता येते किंवा बाहेरुन विकतही आणता येते. ऐनवेळेस दोन्ही नसलं तरी काही बिघडत नाही. विना टमाटा पावडरचाही शाही पनीर मसाला चांगला होतो. शाही पनीर मसाला करण्यासाठी कढई गरम करावी. कढई गरम  झाल्यावर एक एक करुन सर्व मसाले घालावेत आणि मंद आचेवर मसाले 10 मिनिटं भाजून घ्यावेत. मसाले भाजून झाल्यावर थंड होवू द्यावेत. भाजलेले मसाले गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक पावडर होईल असे वाटून घ्यावेत. 

Image: Google

पद्धत दुसरी

मायक्रोवेव्हचा उपयोग करुनही शाही पनीर  मसाला तयार करता येतो. यासाठी सर्व मसाल्याचं सामान एका छोट्या भांड्यात ठेवावं. मायक्रोवेव्ह 150 डिग्री वर प्री हीट करुन गरम करुन घ्यावा. मसाल्याचं भांडं मायक्रोवेव्हमध्ये ठेवून 5 मिनिटं मसाले भाजून घ्यावेत. 5 मिनिटानंतर मायक्रोवेव्ह बंद करुन एकदा भांड्यातले मसाले हलवून घ्यावेत. पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनिटं भाजावेत. मसाले भाजले गेले की ते बाहेर काढून गार होवू द्यावेत. गार झालेले मसाले मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत.

Image: Google

घरी तयार केलेला शाही पनीर मसाला भरपूर काळ टिकून राहातो. त्यासाठी तो हवाबंद डब्यात भरुन ठेवावा आणि वापरताना चमचा कोरडा असल्याची खात्री करुन घ्यावी. वापरल्यानंतर मसाला पुन्हा नीट हवाबंद डब्यात ठेवून द्यावा. एवढी काळजी घेतली तरी शाही पनीर मसाला भरपूर काळ टिकून राहातो.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती