पनीर ही शाकाहारी लोकांच्या अगदी आवडीची गोष्ट. मग पनीरच्या स्टार्टरपासून ते भाजी, पुलाव, पनीर रोल असे पनीरचे एकाहून एक भन्नाट प्रकार करता येतात. हॉटेलमध्ये मिळणारे हे पदार्थ आपण घरच्या घरीही करु शकतो. यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे पनीर पराठा. थंडीच्या दिवसांत गरमागरम पनीर पराठा, त्यावर लोणी किंवा बटर आणि सोबत एखादी चटणी किंवा लोणचं म्हणजे पर्वणीच. प्रोटीनने युक्त असलेले पनीर शरीरासाठी आरोग्यदायी तर असतेच पण टेस्टीही लागते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने हे पनीर पराठे खातात. यामध्ये पनीरसोबत तुम्ही थंडीच्या दिवसांत बाजारात सहज मिळणारे मटार, मेथी या भाज्याही घालू शकता. त्यामुळे त्याची पौष्टीकता आणि चव आणखी वाढू शकेल. झटपट होणारी आणि सगळ्यांना आवरणारी पराठ्याची रेसिपी पाहूया...
साहित्य
१. पनीर - ५०० ग्रॅम
२. आलं मिरची लसूण पेस्ट - एक मोठा चमचा
३. धने जीरे पावडर - एक चमचा
४. मीठ - चवीनुसार
५. कोथिंबीर - अर्धी वाटी - बारीक चिरलेली
६. गव्हाचे पीठ - ८ ते १० पराठ्यासाठी
७. तेल - पाव वाटी
कृती
१. पनीर बारीक किसून घ्यावे.
२. त्यामध्ये आलं, मिरची लसूण पेस्ट, धनेजीरे पावडर, मीठ, कोथिंबीर घालून सारण बनवून घ्यायचे.
३. गव्हाच्या पीठ पोळ्यांना भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्या.
४. कमी पीठाचा गोळा घेऊन यामध्ये पनीरचे सारण घाला.
५. हळूवार पराठा लाटा, लाटताना पराठा फाटणार नाही याची काळजी घ्या.
६. पराठा तव्यावर टाकताना एकदम हळूवारपणे टाका, म्हणजे तो फाटणार नाही.
७. तेल सोडून दोन्ही बाजुने पराठा खरपूस भाजून घ्या.
८. गरमागरम पराठा खायला तयार, हा पराठा तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी, लोणचे, दही, तूप, टोमॅटो सॉस अशा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही गोष्टीसोबत खाऊ शकता.
टिप्स
१. सध्या बाजारात मटार भरपूर मिळतात, त्यामुळे मटारचे दाणे थोडे वाफवून मिक्सर करुन पनीरच्या सारणात एकत्र केले तरीही मटार पनीर पराठा मस्त लागतो.
२. मटारसारखेच मेथी पनीर पराठाही छान लागतो. मेथीची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरुन पनीरच्या सारणात एकत्र केल्यास आणखी एक वेगळा स्वाद येतो आणि भाजीही पोटात जाते.
३. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीरच्या सारणार बारीक चिरलेला कांदा, गरम मसाला यांसारख्या तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी घालू शकता.
४. हा पराठा डब्यात न्यायलाही छान लागतो. तुम्ही एखाद्या ट्रीपला जाणार असाल तर सोबत नेण्यासाठी हा पराठा उत्तम पर्याय आहे. पोटभरीचे आणि हेल्दी पराठे सोबत नेल्यास सगळेच खूश होतात.
५. केवळ नाश्ताच नाही तर थंडीत सुट्टीच्या दिवशी दुपारच्या नाहीतर रात्रीच्या जेवणासाठीही हा पराठा उत्तम पर्याय ठरु शकतो.