Join us  

चटणी खा आणि आजार पळवा! आवळ्याची आंबट तिखट चवीची चटणी खाण्याचे 4 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2022 7:37 PM

औषधं खाण्यापेक्षा पौष्टिक आहार घ्या असं तज्ज्ञ नेहमी सांगतात. आपल्या ताटात चटणीपासून भातापर्यंत सर्व  गोष्टींकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहायला लागलो तर पौष्टिक आणि संतुलित आहाराचे पर्याय नक्कीच मिळतील. चटपटीत आणि पौष्टिक चटणीचा प्रकार म्हणजे आवळ्याची चटणी. ही चटणी हिवाळ्यात नियमित खायलाच हवी. 

ठळक मुद्देआवळा हा अनेक प्रकारे खाल्ला जातो. आवळ्याची चटणी हा आवळा खाण्याचा आणखी एक आरोग्यदायी मार्गआवळ्याच्या चटणीत घातल्या जाणाऱ्या सामग्रीतून आवळ्याची चटणी बहुगुणी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याची चटणी खाणं उत्तम उपाय आहे. 

हिवाळ्यात आवळा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.  आवळ्याचा मोरावळा, कॅण्डी, आवळ्याचा ज्यूस, आवळा पावडर , नुसता आवळा या स्वरुपात आवळा खाणं फायदेशीर ठरतो. या सर्व प्रकारात आवळ्याची चटणी याचाही समावेश करायला हवा. आवळ्याची चटणी करतात हे बहुतेकांना माहीतच नसतं. पण ताज्या आवळ्यांची तिखट-आंबट अशी चटपटीत चटणी केवळ तोंडाला चव आणते असं नाही तर ही चटणी खाण्याचे  आरोग्यास अनेक फायदेही होतात. पराठ्यांसोबत चटपटीत खाण्यची हौस भागवणारी आणि पोटाच्या समस्या दूर करणारी चटणी म्हणजे आवळ्याची चटणी.

  

Image: Google

कशी करायची आवळ्याची चटणी ?

आवळ्याची चटणी करण्यासाठी 100 ग्रॅम ताजे आवळे,  भरपूर कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं,  3- 4 हिरव्या मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि पाणी एवढंच साहित्य घ्यावं.  

आवळ्याची चटणी करताना आधी आवळे स्वच्छ धुवून, पुसून घ्यावेत. आवळे कापून त्यातल्या बिया काढून टाकाव्यात. मिक्सरमधे आवळा, मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडा पुदिना आणि मीठ घालावं. यात थोडं पाणी घालावं. मिक्सरमधून दोन तीन वेळा ते फिरवून घ्यावं. एकदम बारीक पेस्टसारखं मिश्रण झालं की आवळ्याची चटणी तयार होते. चवीला तिखट आंबट लागणाऱ्या या चटणीचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी त्यात थोडं मोहरीचं तेल घालावं. यामुळे चटणीचा स्वाद वाढतो. ही चटणी पराठ्यांसोबत तर छान लागतेच पण साध्या भातासोबतही छान लागते. 

Image: Google

आवळ्याची चटणी का खावी?1.  आवळ्याची चटणी पोटासाठी लाभदायक असते. मुळात आवळा हा पाचक असतो. आवळ्यातील गुणधर्म पचन सुलभ करतात तर चटणीमधे आवळ्यासोबत लसणाच्या पाकळ्याही घातल्या जातात. तळलेल्या आणि परतलेल्या लसणापेक्षा कच्चा लसूण पोटाची समस्यांवर गुणकारी असतो. 

2. आवळ्याची चटणी म्हणजे क जीवनसत्त्वाचा मुख्य स्त्रोत. हिवाळ्यात ताज्या आवळ्यांची चटणी खाल्ल्याने केस, त्वचा, डोळे यांचं आरोग्य चांगलं राहातं.

Image: Google

3. मधुमेह झालेल्यांसाठीही  आवळ्याची चटणी फायदेशीर असते. आवळ्यातील गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते.

4.  हिवाळ्यात फ्लू, सर्दी, खोकला यासारखे संसर्गजन्य आजार होतात. आवळ्याच्या चटणी हिवाळ्यात नियमित खाल्ली तर रोगप्रतिकारशक्ती वाढते. आहारातून आजारांना लांब ठेवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे आवळ्याची चटणी खाणं. 

टॅग्स :अन्नआरोग्यआहार योजना