पाऊस पडत असताना किंवा पावसाळ्यातल्या थंड दिवसात संध्याकाळच्या चहासोबत भजी खाण्याचा मोह होतोच. कांदा भजी, बटाटा भजी, कोबी/ पालकाच्या पानांची भजी तर कधी झणझणीत मिरच्यांची भजी केली जातात. खमंग चवीची भजी खाताना भान राहात नाही हे खरं. पण मग भजी खाल्ल्यानंतर शरीराला जडपणा येतो, ॲसिडिटीचा त्रास होतो, पोट बिघडतं. पावसाळ्यात खमंग खाण्याच्या इच्छेला भजींशिवाय दुसरा पर्याय नसेल तर किमान कधी कधी आरोग्याचा विचार करता पौष्टिक भजींचा विचारही करायला हवा. भजी ही खमंग चटपटीत याच प्रकारची असतात हे माहित असतं. पण पौष्टिक भजी (helathy pakoda) हा भजींचा कोणता प्रकार आणि अशी पौष्टिक भजी कशी करायची असा प्रश्न पडला असेल तर ओव्याच्या पानांची भजी (ajwain leaves pakoda) कशी करायची हे माहिती करुन घ्यायलाच हवं. तरुण पिढीला ही भजी फारशी माहित नसली तरी घरातल्या जेष्ठ व्यक्तींच्या चांगल्याच परिचयाची आहेत. पूर्वी ओव्याच्या पानांच्या भजीसाठी परसबागेतूनच ओव्याच्या पानांची तजवीज व्हायची. आता ही बाजारातून खास शोधून आणावी लागतात. ओव्याच्या पानांची भजी ही चविष्ट आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. ही भजी करायलाही (how to make ajwain leaves pakoda) अत्यंत सोपी आहेत.
ओव्यांच्या पानांची भजी कशी कराल?
ओव्याच्या पानांची भजी करण्यासाठी 20-25 ओव्याची पानं, 1 कप बेसनपीठ, 1 छोटा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चिमूटभर बेकिंग सोडा, पीठ भिजवताना घालण्यासाठी 3 चमचे तेल आणि तळण्यासाठी तेल, चवीपुरती मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला घ्यावा.
Image: Google
ओव्याच्या पानांची भजी करताना एका भांड्यात बेसनपीठ, अर्धा चमचा लाल तिखट, हळद, बेकिंग सोडा, मीठ, हिंग, 3 मोठे चमचे तेल आणि गरजेनुसार पानी घालून पीठ सरसरीत भिजवून घ्यावं. पीठ खूप घट्ट असू नये. पीठ भिजवण्यापूर्वी ओव्याची पानं चांगली धुवून पुसून थोडी हडकून घ्यावी. ओव्याच्या पानांची गुंडाळी करुन पानं चिरुन घ्यावी. चिरलेली ओव्याची पानं भिजवलेल्या भजींच्या पिठात घोळून घ्यावी. कढईत तेल गरम करुन भजी सोनेरी रंगावर तळून घ्यावीत. तळलेली भजी अब्साॅबेंट कागदावर काढून घ्यावी. या भजींवर वरुन चाट मसाला आणि थोडं लाल तिखट भुरभुरावं.
Image: Google
ओव्याच्या पानांची भजी खावी कारण...
1. ओव्याच्या पानांमधील विकर पोटातील ॲसिड स्त्रवण्यास मदत करतात. यामुळे अपचन, आतड्यावरील सूज आणि पोटातील गॅस या पोटाच्या विकारांवर आराम मिळतो. अल्सरच्या त्रासातही ओव्याच्या पानांचे गुणधर्म लाभदायी असतात. अन्ननलिका, पोट आणि आतड्यांवरील जखमा बऱ्या करण्यास ओव्याच्या पानातील गुणधर्म मदत करतात.
2. एनसीबीआयने केलेल्या एका अभ्यासात हे दिसून आलं आहे की ओव्याच्या पानात असलेल्या थाइमोल या तेल घटकामुळे कॅल्शियमला हदयाच्या रक्त वाहिन्यांमध्ये प्रवेश करण्यास रोखतं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहाण्यास, वाढलेला रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत मिळते.
3. ओव्याच्या पानात असलेल्या थाइमोल आणि कार्वाक्रोल हे इसेन्शियल ऑइल जिवाणू आणि बुरशीच्या वाढीविरोधात लढतात. यामुळे फूड पाॅयजनिंगसारख्या समस्यांचा धोका कमी होतो.