ठळक मुद्देसर्दी, खोकला किंवा फुफूसासंदर्भातील विकार टाळण्यासाठी पावसाळ्यात रोज सकाळी अद्रक आणि मधाचे चाटण घ्यावे. पावसाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. याशिवाय टोमॅटो सूपही जास्त प्रमाणात पिणे पावसाळ्यात फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात खवय्यांची फारच पंचाईत होते. पाऊस पडू लागताच अनेक खमंग, चमचमीत आणि चटपटीत पदार्थ तर खावे वाटतात. पण ते पचत नसल्याने मग सगळाच हिरमोड होऊन बसतो. पण खवय्यांनी खाण्याचे टेन्शन सोडावे आणि आपले नेहमीचेच पदार्थ फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवून खावेत, असा सल्ला आहारतज्ञ देत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात 'फिट ॲण्ड फाईन' राहण्यासाठी आणि तुमचे पोट सांभाळून पावसाळा एन्जॉय करण्यासाठी आहारतज्ज्ञडॉ. अलका कर्णिक यांनी सांगितलेले हे पदार्थ नक्की ट्राय करून पहा.
- पाऊस पडल्यानंतर थंड- थंड झालेल्या वातावरणात चहा पिण्याची तल्लफ झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा- केव्हा चहा प्याल, तेव्हा त्यात अद्रक आणि गवती चहा टाकायला विसरू नका. अर्थातच जर तुम्ही दिवसभरातून तीन कपांपेक्षा अधिक चहा पिणार असाल तर प्रत्येकवेळी अद्रक आणि गवतीचहा टाकण्याची गरज नाही. कारण अद्रक आणि गवती चहाच्या अतिवापराने शरीरातील उष्णता वाढू शकते आणि त्यातून भलतेच आजार उद्भवू शकतात. दिवसाचा पहिला चहा मात्र अद्रक किंवा सूंठ आणि गवती चहा टाकूनच घेतला तर अतिउत्तम.
- पिवळेधमक साधे वरण, गरमागरम मऊसूत भात, त्यात घातलेले साजूक तूप आणि वरून पिळलेले लिंबू असा वरणभाताचा आनंद पावसाळ्यात आवर्जून घ्या. अगदी गच्च पोट भरेपर्यंत न खाता कमी आहार घ्या आणि थोड्या थोड्या ब्रेकनंतर खा.वरणात तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरली तर अधिक चागले.
- हिरवे मुग किंवा पाठीची मूगाची डाळ घालून केलेले सूप पावसाळ्यात नक्की खावे. या सूपमुळे शरिरात ॲण्टीबॉडीज तयार होतात आणि शरिरात जर कुठे काही बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ पाहत असेल तर ते देखील लगेचच रोखल्या जाते आणि हे जंतू शरिराबाहेर फेकण्यास मदत होते.
- पावसाळ्यात आपण सर्व प्रकारची कडधान्ये खावीत हे देखील डॉ. अलका कर्णिक यांनी आवर्जून सांगितले आहे. पण कडधान्ये खाताना ती कच्ची न खाता शिजवूनच खा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
- सर्दी, खोकला किंवा फुफूसासंदर्भातील विकार टाळण्यासाठी पावसाळ्यात रोज सकाळी अद्रक आणि मधाचे चाटण घ्यावे.
- पोळी किंवा चपाती ऐवजी भाकरी खाण्याला या दिवसांमध्ये प्राधान्य दिले पाहिजे. कारण भाकरी पचायला हलकी असते.
- फळभाज्या किंवा काकडी, गाजर, बीट, पत्ताकोबी हे पदार्थ किसून घ्या आणि नाचणी किंवा ज्वारीच्या पिठात टाकून त्याचे मस्त गरमागरम थालिपीट करून खा. म्हणजे या भाज्या पोटातही जातात आणि त्याने शरिराला अपायही होत नाही.
- कढीपत्तादेखील पावसाळ्यात आवर्जून खायला हवा. कढीपत्ता खाण्याची उत्तम पद्धत म्हणजे तो आधी स्वच्छ धुवून तव्यावर नीट भाजून घ्या. त्यानंतर थंड झाला की मिक्सरमध्ये फिरवून किंवा हाताने चूरा करून ठेवा आणि भाजी, वरण किंवा इतर कोणत्याही पदार्थात वापरा.
- पावसाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. याशिवाय टोमॅटो सूपही जास्त प्रमाणात पिणे पावसाळ्यात फायदेशीर ठरते.
- केळी खाणे शक्यतो टाळावे. पण जर केळी खायचीच असतील, तर ती दुपारी जेवण झाल्यानंतर खावीत. कारण केळी पचण्यासाठी जड असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही भरपेट जेवण केलेले असेल, तेव्हाच तुम्ही ती पचवू शकता.