Join us  

पावसाळ्यात रानभाज्या का खाव्यात? रानभाज्यांतून मिळणारे हे मौसमी पोषण गमावू नकाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 7:50 PM

पावसाळ्यात रानभाज्या सगळीकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यातून मिळणारे पोषण संपूर्ण वर्षभर पुरेल एवढी एनर्जी देणारे असते. म्हणूनच शरीराला रिफ्रेशमेंट करून फिट ॲण्ड फाईन ठेवणाऱ्या आणि आरोग्यासोबतच घेतात सौंदर्याचीही काळजी घेणाऱ्या रानभाज्या आवर्जून खाव्यात, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

ठळक मुद्देरानभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. त्यामुळे रानभाज्या खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढत नाही.रानभाज्या नियमितपणे खाणाऱ्या व्यक्ती काटक असतात.हाडांचे पोषण आणि हाडांना मजबूती देण्याचे काम रानभाज्या करतात.

हल्ली प्रत्येक जण आराेग्याबात जागरूक झालेला आहे. त्यामुळे रानभाज्यांविषयीची जागृतीही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. ज्याप्रकारे काही भाज्या आणि फळे सिझनेबल असतात, म्हणजे फक्त त्या- त्या ऋतूंपुरतेच येतात, तसाच प्रकार रानभाज्यांचाही असतो. प्रत्येक ऋतूूमध्ये येणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद आवर्जून घेतलाच पाहिजे. याविषयी माहिती सांगताना औरंगाबाद येथील आहारतज्ञ डॉ. अलका कर्णिक म्हणाल्या की पावसाळ्यात दोन प्रकारच्या रानभाज्या येतात. उंचीवरून या भाज्यांचे प्रकार ठरतात. काही भाज्या जमिनीपासून ५ ते ६ सेमी उंच वाढणाऱ्या असतात, तर काही भाज्या यापेक्षा थोड्या मोठ्या असतात. काही रानभाज्यांंची पाने खाल्ली जातात तर काही रानभाज्यांची पाने, फुले, कंद असे सगळेच आरोग्यासाठी पौष्टिक ठरतात. 

 

रानभाज्या का खाव्या ?त्या- त्या प्रांतातल्या खनिजांनी समृद्ध असणे हे रानभाज्यांचे वैशिष्ट्य आहे. रानभाज्यांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस अशा शरीराला रिफ्रेश करणाऱ्या खनिजांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे रानभाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजेत. रानभाज्या खाल्ल्याने शरीर लवचिक बनते आणि त्यांच्यातील औषधी गुणांमुळे अनेक जुनाट आजारही बरे होतात. 

रानभाज्या कशा खाव्यात ?ज्याप्रमाणे रानभाज्या खनिजांनी समृद्ध असतात, त्याचप्रमाणे त्यांची स्वत:ची अशी एक वेगळी चव असते आणि ती खूपच लाजवाब असते. त्यामुळे या चवीला धक्का न लागू देता आणि अती शिजवून त्यांच्यातील पोषण मुल्ये कमी न करता रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत. रानभाज्या एकतर वाफवून खाव्यात किंवा मग भाजून खाव्यात. हल्ली सिझलर्समध्ये ज्याप्रमाणे पनीर आणि अन्य भाज्या भाजून खाल्ल्या जातात, त्याचप्रमाणे रानभाज्याही भाजून खाव्या. भाजताना त्याला थोडेसे तेल, मीठ, मसाला, लाल तिखट किंवा मग हिरव्या मिरचीचे वाटण चोळावे. यामुळे रानभाज्यांमधील पोषणमुल्येही कायम राहतात आणि त्या अधिक टेस्टी लागतात. पुदिना, कैरी, लिंबू टाकून रानभाज्यांची पोषणमुल्ये अधिक वाढविता येतात. या भाज्यांसोबत पोळ्यांऐवजी भाकरी खाणे अधिक आरोग्यदायी असते. भाकरी तांदळाची किंवा नाचणीची असावी. उडीद आणि ज्वारी यांचे पीठ एकत्रित करून बनविलेली कळण्याची भाकरी रानभाज्यांसोबत खाणे केव्हाही अधिक चांगले.  

टॅग्स :अन्नआरोग्यमहिला