Join us  

फणस खाता आणि आठळ्या टाकून देता? आठळ्यांची करा रुचकर भाजी.. कोरडी आणि रश्याची झणझणीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2022 7:36 PM

निरोगी आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खा फणसाच्या आठळ्यांची रुचकर भाजी

ठळक मुद्देफणस जितका चवीचा तितक्याच या आठळ्या चविष्ट करुन खाता येतात. फणसाच्या आठळ्यांची सुकी आणि रश्याची अशी दोन्ही प्रकारे भाजी करता येते.

फणस खायला कोणाला आवडत नाही. पण फणसाचा गरच खावा आणि आठळ्या टाकून द्याव्यात हा काही नियम नाही. आणि रुचकर खाण्याच्या नियमांमध्ये तर या नियमाला जागाच नाही. फणस जितका चवीचा तितक्याच या आठळ्या चविष्ट करुन खाता येतात. फणसाच्या आठळ्यांची सुकी आणि रश्याची अशी दोन्ही प्रकारे भाजी करता येते. भाजीच्या स्वरुपात फणसाच्या आठळ्या जितक्या रुचकर लागतात तितक्याच त्या आरोग्यासही फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी तर आठळ्यांची भाजी अवश्य खावी.

Image: Google

आठळ्यांची सुकी भाजी

आठळ्यांची सुकी भाजी करण्यासाठी 15-20 आठळ्या, 2 मोठे चमचे खोवलेलं ओलं खोबरं, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, 1 मोठठाचमचा तेल, मोहरी, 1 छोटा चमचे जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घ्यावं आणि अर्धा चमचा साखर घ्यावी.भाजी करण्यासाठी आधी आठळ्या थोड्याश पाण्यात थोडं मीठ टाकून उकडून घ्याव्यात. उकडलेल्या बिया गार झाल्या की सोलून घ्याव्यात. सोललेल्या बियांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.

कढईत तेल गरम करुन मोहरी, जिऱ्याची फोडणी द्यावी. नंतर यात हळद आणि तिखट घालावं. आठळ्यांचे तुकडे घालून ते फोडणीत चांगले मिसळून परतून घ्यावेत. कढईवर झाकण ठेवावं. झाकणावर थोडं पाणी ठेवून भाजीला 5-7 मिनिटं मंद आचेवर वाफ काढावी. भाजीला चांगली वाफ आली की त्यात खोवलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालावी. भाजीत मीठ घालून भाजी 2-3 मिनिटं परतून घ्यावी. ही भाजी नरम नरम फुलक्यांसोबत छान लागते. 

Image: Google

आठळ्यांची मसालेदार भाजी

आठळ्यांची मसालेदार भाजी करण्यासाठी 15-20 आठळ्या, 1 मोठा कांदा, 1 मोठा टमाटा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा लसणाची पेस्ट, 1 छोटा चमचा काळी मिरेपूड, 1 तमालपत्रं, 1 मोठा चमचा बेसनपीठ, गरजेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावं. आठळ्यांची मसालेदार भाजी करण्यासाठी आधी आठळ्या थोड्याशा पाण्यात मीठ घालून उकडून घ्याव्यात. आठळ्या गार झाल्या की सोलून त्याचे बारीक तुकडे करावेत.

कढईत तेल घ्यावं. ते गरम करुन मध्यम आचेवर गरम करावं. तेल गरम झालं की त्यात तमालपत्रं आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. कांदा परतला गेला की लसणाची पेस्ट घालून ती परतून घ्यावी. नंतर यात क्रमानं धने पावडर, लाल तिखट आणि इतर सर्व मसाले घालावेत. मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यावा. मसाला परतला गेला की त्यात बारीक चिरलेला टमाटा घालावा. टमाटा मऊ होईपर्यंत परतावा.  टमाटा मऊसर झाला की त्यात बारीक चिरलेल्या आठळ्या घालाव्यात. आठळ्या परतून 2-3 मिनिटं परतून घ्याव्यात.  आठळ्या परतल्या गेल्या की त्यात बेसन पीठ घालावं आणि पुन्हा आठळ्या 2-3 मिनिटं परतून घ्याव्यात. भाजीत थोडं गरम पाणी घालवं. कढईवर झाकण ठेवावं. झाकणावर पाणी ठेवून भाजी 8-10 मिनिटं शिजवावी. नंतर गॅस बंद करुन वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरुन घालावी.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.