Join us  

गुळाचा पराठा कधी खाल्ला आहे? तज्ज्ञ सांगतात हिवाळ्यात गुळाचा पराठा खाण्याचे ४ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 7:32 PM

थंडीत शरीराला हवे असतात ऊब देणारे पदार्थ. तरच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढून या काळातल्या संसर्गजन्य आजारांपासून आरोग्याचं रक्षण होतं.

ठळक मुद्देकडाक्याच्या थंडीत सकाळी नाश्त्याला आठवड्यातून एकदा दोनदा गुळाचा पराठा खाल्लास शरीराचं तापमान नियंत्रित राहातं.गुळाचा पराठा आपल्या श्वसननलिकेचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यास फायदेशीर असतो.गुळाचा पराठा आणखी पौष्टिक करण्यासाठी त्यात थोडी बदाम आणि काजूची पूड सारणात मिसळावी.

 कडाक्याच्या थंडीत सकाळी भूकही कडाक्याची लागते. ती भागवायची तर चटपटीत नको पौष्टिकच हवं. कारण भूक भागवण्यासोबतच थंडीचा सामना करण्यासाठी आवश्यक ताकदही शरीराला आवश्यक असते. त्यासाठी गुळाचा पराठा उपयोगी ठरतो. पोषण तज्ज्ञ एकता सूद थंडीत गुळाचे पराठे खाण्याचा सल्ला देतात आणि त्याचे फायदेही सांगतात.

Image: Google

गुळाचा पराठा फायदेशीर कसा?

1. गुळामधे कॅल्शियम, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशियम ही खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. गुळातील हे घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर असतात. थंडीत शरीराची प्रतिकाराशक्ती कमी होते. त्यामुळे संसर्गजन्य या काळात होतात. या आजारांपासून सुरक्षित राहाण्यासाट्ही गुळाचा पराठा खाणं चांगला पर्याय आहे.

2. हिवाळ्यात शरीर गरम ठेवणारे पदार्थ ही शरीराची मुख्य गरज असते. कडाक्याच्या थंडीत सकाळी नाश्त्याला आठवड्यातून एकदा दोनदा गुळाचा पराठा खाल्लास शरीराचं तापमान नियंत्रित राहातं.

3. हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे हवेतील प्रदूषणही खूप वाढतं. यामुळे श्वसननलिकेशी संबंधित आजार/ त्रास होतात. हे टाळायचे तर गुळाचा पराठा मदत करतो. गुळ आपल्या श्वसननलिकेचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यास फायदेशीर असतो.

4. गुळाचा पराठा खाल्ल्याने शरीरातील दूषित आणि विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. बॉडी डिटॉक्ससाठी गुळ पराठ्यासारखा दुसरा चविष्ट पर्याय नक्कीच नसेल.

Image: Google

गुळाचा पराठा कसा कराल?

गुळाचा पराठा करण्यासाठी पाव किलो कणिक, 2 कप किसलेला गूळ, 1 छोटा चमचा पांढरे तीळ, 1 मोठा चमचा बारीक वाटलेले काजू, 1 मोठा चमचा बदामाची पूड , साजूक तूप आणि मीठ एवढी सामग्री लागते.

गुळाचा पराठा करतान आधी कणिक थोडंसं मीठ घालून मळून घ्यावी. कणिक अगदी मऊ मळलेली असावी. ती मळल्यानंतर थोड्यावर मुरु द्यावी. तोपर्यंत पराठ्याचं सारण तयार करावं. एका भांड्यात किसलेला गूळ घ्यावा. त्यात बदाम आणि काजूची पूड घालून ते चांगलं मिसळून घ्यावं.

Image: Google

पीठ तेलाचा हात लावून मऊ करुन घ्यावं. पिठाचा गोळा करुन तो हातानं मोठा करुन त्यात दोन चमचे गुळाचं सारण भरावं. सारण भरलेली लाटी कोरड्या पिठाच्या मदतीनं हळुवार लाटावा. तव्यावर थोडं तूप घालून पराठा दोन्ही बाजूंनी थोडं साजूक तूप घालून सोनेरी रंगावर शेकावा. पराठा शेकताना साजूक तूप थोडं लावावं. पराठा गरम गरम वरुन थोडं साजूक तूप घालून खावा. नुसता तुपासोबत किंवा शेंगदाण्याच्या / तिळाच्या तिखट चटणीसोबत छान लागतो.

टॅग्स :आहार योजनाआरोग्यअन्न