Join us  

आवडतात म्हणून रोज भरपूर आंबे खाता? अती आंबे खाण्याचेही दुष्परिणाम, तज्ज्ञ सांगतात आंबे खाण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 1:57 PM

आवडतात म्हणून आंबे जास्त खाल तर आजारी पडाल; तज्ज्ञ सांगतात आंबे खाण्याची योग्य पध्दत

ठळक मुद्देआंब्यामध्ये कॅलरीज आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. आंब्यातील आरोग्यदायी गुणधर्मांचा शरीराला फायदा होण्यासाठी आंबा योग्य पध्दतीनं आणि प्रमाणात खायला हवा.आंबा खाताना त्यासोबत काय खाल्लं जातं यालाही महत्व आहे.आंब्यासोबत जड पदार्थ खाणं अयोग्य आहे. 

 लहान असो नाही तर मोठे आंबे खायला सगळ्यांनाच आवडतं.  उन्हाळा म्हणजे मनसोक्त आंबे खाण्याचा सिझन. आंब्यात अ,ब, क, ई ही जीवनसत्व, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखी महत्वाची खनिजं, फायबर हा महत्वाचा घटक असल्यानं आंबा हा अनेक अंगानं आरोग्यास फायदेशीर ठरत असल्यानं आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. पण म्हणून अगदीच बेफिकीर होवून प्रमाणाच्या बाहेर आंबे खाऊ नये.

Image: Google

कोणतीही गोष्ट कितीही पौष्टिक असली तरी ती प्रमाणात खाल्ली तर फायदा आणि प्रमाणाच्या बाहेर खाल्ली तर आरोग्यास तोटा होतो. हाच नियम आंब्याच्या बाबतीतही लागू आहे. प्रमाणापेक्षा अधिक आणि चुकीच्या पध्दतीनं आंबे खाल्ले तर आरोग्य बिघडण्यास आंबा कारणीभूत ठरु शकतो. म्हणूनच आंबे प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्यास काय तोटे होतात हे समजून घेणंही आवश्यक आहे. 

Image: Google

आंबे प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले तर..

1. मध्यम आकाराच्या आंब्यात 135 कॅलरीज असतात. म्हणूनच प्रमाणापेक्षा जास्त आंबे खाल्ले तर वजन वाढतं. 

2. आंब्यात नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणावर असते. जास्त आंबे खाल्ले तर शरीरात जास्त साखर जाते. त्याचा परिणाम रक्तातील साखर वाढते तसेच यामुळे वजन वाढण्याचाही धोका आहे. 

3. आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड सारख्या रासायनिक घटकांचा वापर केला जातो. अशा पध्दतीनं पिकवलेले आंबे जास्त खाल्ल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. 

4. आंब्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्यास पोटात जास्त फायबर जातं. त्यामुळे पोट खराब होतं. जुलाब होतात. 

Image: Google

5. आंब्याच्या तोंडाशी एक पातळ चिकट पदार्थ असतो.  तो नीट साफ न करता आंबा तसाच खाल्ला तर घशाला त्रास होतो. 

6. आंबा हे प्रकृतीनं गरम फळ आहे, जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढून चेहऱ्यावर फोड, मुरुम, पुटकुळ्या येऊन चेहरा खराब होतो. 

7. आंबा खाताना तो व्यवस्थित पिकलेला हवा. तो जर कच्चा असेल, नीट पिकलेला नसेल तर पचनक्रिया बिघडते. कच्चा आंबा खाण्यात आल्यास पचनास मदत करणारे विकर निर्माण होण्यात अडचणी येतात. 

8. प्रमाणापेक्षा जास्त आंबे खाल्ल्यास एनफिलेक्टिक शाॅकसारखा ॲलर्जीचा त्रास होवू शकतो. यात जास्त आंबे खाल्ल्यानं ॲलर्जेटिक रिॲक्शन होवून मळमळ, उलटी होणं असे त्रास होतात. 

Image: Google

आंबा कसा खावा?

आंब्यातील आरोग्यदायी गुणधर्मांचा शरीराला फायदा होण्यासाठी आंबा योग्य पध्दतीनं आणि प्रमाणात खायला हवा.  वैद्य राजश्री कुलकर्णी ( एमडी आयुर्वेद, नाशिकस्थित प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ) यांनी  आंबे खाण्याच्या नियमांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.  आंबा हे मांसल फळ आहे, त्यामुळे ते पचायला जड असतं. त्यामुळे एका वेळी खूप आंबे खाणं, दिवभरात भरपूर आंबे खाणं यामुळे पोट बिघडणं, पचनाचे विकार उद्भवतात. दिवसाला 2 किंवा 3 आंबे खाणं योग्य ठरतं. आंबे कापून किंवा रस करुन  खाल्ला तरी चालतो. 

Image: Google

आयुर्वेदानुसार आंब्याचं पचन चांगलं व्हावं यासाठी आंब्याचा रस साजूक तूप घालून खावं. तुपामुळे आंबा शरीराला बाधत नाही. आयुर्वेद कोणत्याही फळात दूध मिसळून खाऊ नका असं सांगतं. त्याला आंबा हा अपवाद आहे. आंबे गोड असतील तर त्याचा रस करताना त्यात थोडं दूध घालावं. किंवा अशा आंब्याचा दूध घालून मिल्क शेक करावा. पण आंबा आंबट असेल , तो नीट पिकलेला नसेल तर त्यात दूध घालू नये. आंब्याचं पचन चांगलं होण्यासाठी त्यात थोडी मिरपूड किंवा सूंठ घालावी. 

Image: Google

आंबा खाताना त्यासोबत काय खाल्लं जातं यालाही महत्व आहे. आंब्याच्या रसासोबत पोळी खावी. पण पुरणाची पोळी, मांडे ही पक्वानं जड असतात. आंबाही पचण्यास जड असतो. अशा वेळेस दोन्ही पदार्थ पचनास जड होवून त्याच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. आंब्यासोबत तळलेले पदार्थ, भजी , पापड, कुरडया असे पदार्थ खाणं टाळावं. कधीतरी आमरस पुरी खाण्यास हरकत नाही. पण तीही प्रमाणातच. आंबा हा जेवणाआधी किंवा जेवणानंतर खाण्यापेक्षा जेवणात खाणं हितकर आहे. चांगली भूक लागलेली असेल तेव्हा आंबा चिरुन खाल्ल्यास त्याचा फायदा आरोग्यास मिळतो. 

 

टॅग्स :आंबाअन्नआहार योजनाआरोग्य