हिवाळ्यातील गुलाबी थंडी प्रत्येकाला आवडते. थंडीच्या दिवसात हिरव्या भाज्या स्वस्तात मिळतात. पालक, मेथी, हिरवे वाटाण्याची भाजी प्रत्येकाला आवडते. या दिवसात हिरव्या भाज्या चवीला देखील उत्तम लागतात. हिरव्या वाटाण्यापासून आपण उसळ, कटलेट, पुलाव असे अनेक पदार्थ बनवतो. हिरवे वाटाणे आरोग्यासाठी पौष्टीक देखील असतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात. हिरव्या वाटाण्याचे आपल्याला फायदे आणि वापर माहित आहे. आपण मटार काढून त्याचे साल फेकून देतो. मात्र, ते साल फेकून न देता त्याचा वापर आपण इतर गोष्टींसाठी करू शकतो. आपण मटारच्या सालीपासून भाजी बनवू शकता. ही भाजी चवीला उत्तम लागते, यासह झटपट बनते. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात.
मटारच्या सालीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
हिरव्या वाटाण्याचे साल
बटाटे
तेल
जिरं
कांदा
मीठ
हळद
आलं लसूण पेस्ट
टॉमेटो प्युरी
धणे पावडर
लाल तिखट
गरम मसाला
कृती
हिरव्या वाटण्याच्या सालीपासून भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, हिरवे वाटाणे सोलून साली चांगल्या धुवून घ्या. बटाट्याचे साल काढून धुवून घ्या त्याचे बारीक लांब काप करून घ्या. दुसरीकडे एका नॉन - स्टिक तव्यावर तेल गरम करत ठेवा. त्यात जिरं टाकून कांद्याचे बारीक काप टाका, सोनेरी रंग येऊपर्यंत कांद्याला चांगले भाजून घ्या.
कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्यात बटाट्याचे काप टाका. मग मीठ, हळद, आलं - लसूण पेस्ट टाकून पुन्हा मिक्स करा, आणि त्यावर झाकण झाकून एक वाफ द्या. बटाटे शिजल्यानंतर त्यात टॉमेटो प्युरी टाका, व तीन मिनिटे शिजवून घ्या. बटाटे शिजल्यानंतर त्यात मटारचे साल टाका. धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला टाकून मिश्रण मिक्स करा. एक वाफ दिल्यानंतर एका बाउल ही भाजी काढून घ्या. अशाप्रकारे मटारच्या सालीपासून भाजी खाण्यासाठी रेडी. आपण ही भाजी चपाती, भातासह खाऊ शकता.