Join us  

मुरमुरे खा आणि फिट राहा कारण चटपटीत मुरमुरे पौष्टिकही असतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 6:08 PM

मुरमुरे आणि चटपटीतपणा अशी छान गट्टी जमलेली असते. पण हेच चटपटीत मुरमुरे आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहेत असं म्हटलं तर विश्वास बसेल का तुम्हाला? पण हे खरंच आहे मुरमुरे हे खाण्यास पौष्टिकही असतात. ते कसे?

ठळक मुद्दे१०० ग्रॅम मुरमुऱ्यांमधे ९० ग्रॅम कर्बोदकं असतात, जे शरीरास ऊर्जा देतात.वजनाला अतिशय हलके फुलके असलेले मुरमुरे हाडांची ताकद वाढवायला मदत करतात. वजन कमी करण्यासाठी मुरमुरे खाणं हे लाभदायक ठरतं.

 भूक लागली खाऊ हवा म्हटलं की मुरमुरे येतात डोळ्यासमोर. शेवेत थोडे मुरमुरे टाकून लहानपणी अनेकांनी खाऊ म्हणून खाल्ले असतील.मुरमुऱ्याचा चिवडा , मुरमुऱ्याचं भडंग अशा चटपटीत स्वरुपात मुरमुरे खाण्याची सवय असते आपल्याला. घरात नुसतेच मुरमुरे असतील तर त्यावर थोडं कच्चं तेल टाकून तिखट, मीठ भूरभूरुन खाल्ले तरी तोंडाला चव येते. मुरमुरे आणि चटपटीतपणा अशी छान गट्टी जमलेली असते. पण हेच चटपटीत मुरमुरे आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहेत असं म्हटलं तर विश्वास बसेल का तूम्हाला? पण हे खरंच आहे मुरमुरे हे खाण्यास पौष्टिकही असतात. एक पौष्टिक खाऊ म्हणून मुरमुऱ्यांचा नक्कीच विचार करता येतो. मुरमुरे महाराष्ट्र, बिहार, कोलकत्ता, छत्तीसगड, ओरिसा, गुजरात या राज्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. मुरमुरे हे खास चवीसाठी म्हणून लोकप्रिय असले तरी त्याचे आरोग्यदायी फायदेही खूप आहेत. ते जाणून घेतले तर मुरमुरे नुसता खाऊ म्हणून न खाता पौष्टिक खाऊ म्हणून आवर्जून खाल्ला जाईल.

मुरमुरे पौष्टिक कसे?१०० ग्रॅम मुरमुऱ्यांमधे भरपूर प्रमाणात कर्बोदकं, प्रथिनं, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह असतं. मुरमुऱ्यांमधे आरोग्यास अपायकारक वाईट फॅटस आणि कोलेस्ट्रॉल नसतं. त्यामुळे मुरमुरे खाल्ल्यानं आरोग्यास फायदाच जास्त होतो.

  • चटपटीत मुरमुरे पौष्टिकतेसाठी खावेत असं आहारतज्ज्ञ म्हणतात. १०० ग्रॅम मुरमुऱ्यांमधे ९० ग्रॅम कर्बोदकं असतात, जे शरीरास ऊर्जा देतात. शरीरास कर्बोदकं मिळाले की ऊर्जा येते आणि थकवाही जातो. जर आपण रोज १०० ग्रॅम मुरमुरे खाल्ले तर आपल्याला अशक्तपणा जाणवत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुरमुरे खाऊन शरीरास फायदाच होतो तोटा काहीच नाही.
  •  पचनक्रियेस मुरमुरे चालना देतात. मुरमुऱ्यात तंतूमय घटक असतात त्याचा आतड्यांना फायद होतो आणि पोटासंबंधीच्या समस्याही यामुळे दूर होतात. मुरमुरे खाल्ल्यास बध्दकोष्ठता जाणवत नाही. जर सकाळी पोट दुखण्याची किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या असेल तर मुरमुरे खाणं फायदेशीर ठरतं. मुरमुऱ्यांमधे चांगले जिवाणू असतात ते बध्दकोष्ठता होऊ देत नाही,
  • वजनाला अतिशय हलके फुलके असलेले मुरमुरे हाडांची ताकद वाढवायला मदत करतात. हाडं जर बळकट नसतील तर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो पण तज्ज्ञ म्हणतात की दुधासोबत १०० ग्रॅम मुरमुरे खाल्ले तर त्यातून ब, ब२ आणि ब१ ही महत्त्वाची जीवनसत्त्वं मिळतात. त्यासोबतच मुरमुऱ्यांमधे मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असतं त्याचा फायदा दात आणि हाडांच्या मजबूतीला होतो. म्हणूनच हाडांचं आरोग्य सांभाळण्यासाठी तज्ज्ञ  दुधासोबत मुरमुरे खाण्याचा सल्ला देतात.
  • मुरमुऱ्यांमधे सोडियम भरपूर प्रमाणात असतं. त्याचा फायदा रक्तदाबासंबंधीच्या विकारांवर होतो. मुरमुऱ्यांमधील सोडियममुळे रक्तदाब नियंत्रित राहातो. रक्तदाबाची समस्या असलेल्ल्यांना आहारतज्ज्ञ्स मुरमुरे खाण्याचा सल्ला देतात.
  •  वजन कमी करण्यासाठी किती उपाय केले जातात. पण त्यासाठी या हलक्याफुलक्या मुरमुऱ्यांकडे मात्र लक्ष जात नाही. वजन कमी करण्यासाठी मुरमुरे खाणं हे लाभदायक ठरतं. कारण मुरमुरे खाल्ल्यानं पोट लवकर भरतं शिवाय दीर्घाकाळ भूक लागत नाही. त्यामुळे जंक फूड खाण्यापासून आपण स्वत:ला रोखू शकतो त्याचा परिणाम म्हणजे वजन नियंत्रित राहातं.

 पौष्टिक स्वरुपात मुरमुरे खाण्याचे अनेक प्रकार आहेत. मुरमुऱ्यांचं पीठ करुन त्याचे डोसे, मुरमुऱ्यांचा सुशिला, मुरमुऱ्यांचे लाडू , चिक्की या अनेक प्रकारे मुरमुरे खाता येतात.