गुजराती खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या प्रसिद्ध पदार्थांच्या यादीतील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे खाकरा. खाकरा म्हटलं कि हलका - फुलका खायला सोपा कुरकुरीत खाकरा सगळ्यांनाच आवडतो. लहान मुलांना डब्यात देण्यासाठी, संध्याकाळचा सुका खाऊ म्हणून, चटपटीत तोंडी लावण्यासाठी म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांसाठी खाकरा आवडीने खाल्ला जातो. सध्या बाजारात असंख्य प्रकारचे खाकरे उपलब्ध असतात. गहू, बाजरी, ज्वारी यांच्या पिठापासून बनविले जाणारे पारंपरिक खाकरे तर मिळतातच. यासोबतच पाणीपुरी खाकरा, पावभाजी खाकरा, शेजवान खाकरा असे फ्लेवर्ड खाकरे खाणे सुद्धा लोक पसंत करतात. जर तुम्हांला असे वेगवेगळ्या फ्लेवर्ड मधील खाकरे खायला आवडत असतील तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. झटपट ५ मिनिटांत होणारा गार्लिक ब्रेड फ्लेवर्ड खाकरा कसा बनवायचा ते समजून घेऊयात(Garlic Bread Khakra Recipe).
Pickles & Wine या इंस्टाग्राम पेजवरून गार्लिक ब्रेड फ्लेवर्ड खाकरा कसा बनवायचा याची पाककृती दिली आहे.
साहित्य -
१. बटर - २ टेबलस्पून
२.लसूण - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
३. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
४. मिक्स हर्ब्स - १ टेबलस्पून
५. मीठ - चवीनुसार
६. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून
७. चीज - १ टेबलस्पून
८. प्लेन खाकरा - २ ते ३
९. काळीमिरी पूड - चिमूटभर
कृती -
१. एका छोट्या बाऊलमध्ये बटर घेऊन त्यात लसूण, कोथिंबीर, मीठ, काळीमिरी पूड घालून गार्लिक बटर तयार करून घ्या.
२. एका प्लेटमध्ये प्लेन खाकरा घेऊन त्यावर हे गार्लिक बटर लावून घ्या.
३. गार्लिक बटर लावल्यावर ३० सेकंदांसाठी हा खाकरा मायक्रोव्हेव करून घ्या.
४. मायक्रोव्हेव केल्यानंतर हा खाकरा बाहेर काढून त्यावर किसलेले चीज आणि चिली फ्लेक्स घालून घ्या.
५. त्यानंतर परत ३० सेकंदांसाठी खाकरा मायक्रोव्हेव करून घ्या.
तुमचा गार्लिक ब्रेड फ्लेवर्ड खाकरा खाण्यासाठी तयार आहे.