Join us  

नितळ त्वचा, घनदाट केस आणि दणकट तब्येत, खा ‘हे’ पारंपरिक लाडू! थंडीत पौष्टिक चंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 12:51 PM

जवसातील अनेक घटक उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असतात, त्यामुळे थंडीच्या दिवसांत हे लाडू खाऊन तुम्ही तब्येतीबरोबरच सौंदर्यही खुलवू शकता...

ठळक मुद्देलठ्ठपणा कमी करण्यासाठी, हृदरोग आणि उच्च रक्तदाबासाठीही जवस उपयुक्त घरच्या घरी करता येण्याजोगी सोपी रेसिपी, कुटुंबातील सगळ्यांचेच आरोग्य ठेवा चांगले

आपले केस घनदाट आणि लांबसडक असावेत, त्वचा टीव्ही किंवा चित्रपटातील अभिनेत्रींसारखी नितळ असावी आणि नखंही छान चमकदार असावीत असे प्रत्येक तरुणीला आणि महिलेला वाटत असते. थंडीचा काळ हा आपले आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्याचे उत्तम रितीने पोषण करण्यासाठी अतिशय चांगला मानला जातो. या काळात खाल्लेले अन्न चांगल्या रितीने पचते आणि अंगी लागते. त्यामुळे या कालावधीत गरमागरम सूपापासून ते पौष्टीक लाडूपर्यंत आणि तळलेल्या पदार्थांपासून ते गोडाधोडापर्यंत सगळ्या गोष्टी शरीर पचवू शकते. चला तर मग पाहूया अशाच एका पौष्टीक आणि तरीही टेस्टी लाडूची रेसिपी....

साहित्य - 

जवस - पाव वाटीदाणे - अर्धी वाटीतीळ - पाव वाटी बदाम - अर्धा वाटीआक्रोड - पाव वाटी सूर्यफूल बिया - पाव वाटीलाल भोपळ्याच्या बिया- पाव वाटीगूळ - आवडीनुसार 

कृती -

१. वरील सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या बारीक गॅसवर हलक्या भाजून घ्या.

२. तीळ, जवस, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया हलक्या असल्याने पटकन काळ्या होऊ शकतात. तसे होऊ नये म्हणून सतत हलवत राहा.

३. हे सगळे गार झाल्यावर एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्या.

४. कढईत साधारण अर्धी वाटी गूळ घालून त्यात थोडे पाणी घाला आणि त्याचा पाक बनवून घ्या. 

५. हा पाक एकसारखा झाला की मिक्सर केलेली पावडर त्यामध्ये घाला आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवा. 

६. हलक्या हाताने एसारखे लाडू वळा. लाडू वळले जात नसतील तर हाताला थोडेसे तेल लावा.  

जवसाचे फायदे 

१. जवसामध्ये आयर्न, कॅल्शियम आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा, केस आणि नखांच्या आरोग्यासाठी तसेच इतरही अनेक गोष्टींसाठी हे लाडू खाणे उपयुक्त ठरु शकते. 

२. याबरोबरच जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, तसेच अँटी-ऑक्सिडंट हे गुणधर्मही मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व घटक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून दररोज काही प्रमाणात जवस पोटात गेल्यास त्याचा फायदा होतो. 

३. रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहण्यास जवसाचा उपयोग होतो. 

४. अनेक स्त्रियांना हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास असतो, त्यामुळे विविध समस्या उद्भवतात. ही हॉर्मोन्सची पातळी योग्य ठेवण्यासाठी जवस खाणे फायदेशीर ठरते. 

५. पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी जवस अतिशय उपयुक्त आहे. यामुळे पित्त तर कमी होतेच पण पचनक्रिया सुधारण्यासही जवसाचा उपयोग होतो. 

६. लठ्ठपणाची समस्या असणाऱ्यांनी हे लाडू खाल्ल्यास वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी जवस खाणे हा उत्तम उपाय आहे. 

७. ज्यांना हृदयविकार आणि रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही जवस फायदेशीर असते. रोज साधारण एक चमचा जवस खाल्ल्यास या समस्या कमी होण्यास मदत होते. 

८. पाठदुखी ही सध्या सर्वच वयोगटातील महिलांची समस्या झाली आहे. चुकीच्या जीवनपद्धतीमुळे उद्भवणारी ही समस्या वेळीच आटोक्यात आणायची असेल तर जवस खाणे फायद्याचे ठरते. 

९. डायबिटीस ही जीवनशैलीविषयक समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जवस चांगले काम करते. टाईप – टू डायबेटीस अस‍णाऱ्या रुग्णांमध्ये जवसातील लिग्नन उपयुक्त ठरते. कारण हे लिग्नन ब्लड शुगरचा समतोल साधते.

१०. जवसातील प्रथिनांमुळे हाडे मजबूत राहण्यासही मदत होते आणि सांधेदुखीसारख्या समस्यांपासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो.  

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स