थंडी पडायला सुरुवात झाली की आपल्याकडे लगेच सुकामेवा, पौष्टीक लाडू यांसारखे पदार्थ खायला सुरुवात होते. सुकामेव्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्रास वापरला जाणारा घटक म्हणजे बदाम. आता हा बदाम आरोग्यासाठी किती फायदेशीर असतो याबाबत आपल्याला माहिती असते. पण हे बदाम कसे खावेत, कोणी, कधी, किती खावेत याचे काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास बदाम खाण्याचे शरीराला अतिशय उत्तम फायदे होता. मात्र कोणत्याही वेळेला, चुकीच्या पद्धतीने बदाम खाल्ल्यास त्याचा आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. त्यामुळे आहार घेताना त्याचे नियम, शरीरासाठी असणारे फायदे-तोटे, अतिसेवनामुळे होणारे परिणाम यांबाबत पुरेशी माहिती असायला हवी. नियमित बदाम खाल्ल्याने त्वचा, केस चांगले होण्यास मदत होते. बदामामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते, बदाम खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. दातांचे आणि हाडांचे आरोग्य चांगले राखण्यास बदाम उपयुक्त ठरतात.
बदामातील उपयुक्त घटक
१. व्हीटॅमिन इ२. फायबर ३. ओमेगा ३ फॅटी अॅसिड ४. प्रोटीन्स ५. मॅग्नेशियम ६. कॅल्शियम७. झिंक
बदाम खाण्याची योग्य पद्धत
१. बदामाच्या सालात टॅनिन नावाचा एक घटक असतो. बदाम रात्री भिजत घातल्यास ही साले निघून येण्यास मदत होते. बदामातील उपयुक्त घटक शोषून घेण्यासाठी टॅनिन हा घटक प्रतिबंध करतो म्हणून बदामाची साले खाल्लेली चांगली नाहीत.
२. बदाम भाजल्यास त्यातील आवश्यक घटकांमध्ये बदल होण्याची शक्यता असते. भाजल्यामुळे बदामातील हेल्दी फॅटस निघून जातात, तसेच त्यातील पोषकता कमी होते. त्यामुळे बदाम कधीही भाजू नयेत. भाजलेले बदाम आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
३. कच्चे बदाम हे पचनासाठी जड असतात, त्यामुळे ते थेट खाल्ल्यास पचनशक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हेच बदाम भिजवून खाल्ल्यास ते पचायला हलके होतात आणि त्याचा शरीराला चांगला फायदा होण्यास मदत होते.
४. दिवसभरात कधीही बदाम खाण्यापेक्षा सकाळी उठल्यावर किंवा ब्रेकफास्टच्या वेळी हे भिजवलेले बदाम खाणे केव्हाही फायद्याचेच ठरते. सकाळी त्यातील सर्व घटक योग्य पद्धतीने शरारीत शोषले जातात तसेच पोट भरल्यासारखे वाटते.
५. एका दिवसात ६ ते ७ पेक्षा जास्त बदाम खाऊ नयेत. त्यामुळे उष्णता वाढून त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.