Fruit Vs Fruit Juice : वजन कमी करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, त्वचा चांगली ठेवण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट नेहमीच वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देतात. पण जास्तीत जास्त लोक थेट फळं खाण्याला महत्व देण्याऐवजी ज्यूस पितात. मात्र, सगळेच हेल्थ एक्सपर्ट, न्यूट्रिशनिस्ट हेच सांगतात की, फळांच्या ज्यूसऐवजी फळं खावीत. अशात अनेकांना प्रश्न पडू शकतो की, फळं खाण्यात आणि फळांच्या ज्यूसमध्ये काय फरक आहे? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...
आयएएनएसनं याबाबत न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्सपर्ट रिद्धि खन्नासोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, फळं आणि त्यांचा ज्यूस दोन्हींचे आपापले फायदे आहेत. मात्र, थेट फळं खाणं अधिक फायदेशीर ठरतं.
फळांमध्ये अधिक फायबर
एक्सपर्ट सांगतात की, फळांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं, जे पचन तंत्र आणि ब्लड शुगरसाठी फायदेशीर असतं. जेव्हा आपण थेट फळ खातो, तेव्हा भरपूर फायबर मिळतं. तर फळांचा ज्यूस केल्यावर त्यातून फायबर गायब होतं.
ज्यूसमध्ये कमी पॉवर
फळांमध्ये फायबर तर भरपूर मिळतंच, सोबतच यातून अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्सही मिळतात. ही सगळी तत्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यांनी वेगवेगळ्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. दुसरीकडे ज्यूसमध्ये हे पोषक तत्व असतात, पण कमी असतात. फायबर यातून जवळपास निघून जातं.
वजन कमी करण्यासाठी फळं जास्त फायदेशीर
एक्सपर्टनी सांगितलं की, फळांच्या ज्यूसच्या तुलनेत वजन कमी करण्यासाठी थेट फळं खाणं जास्त फायदेशीर ठरतं. फळं खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरून राहतं आणि त्यामुळे आपण जास्त काही खात नाही. तेच ज्यूस प्यायल्यानं कॅलरी इनटेक जास्त होतं आणि वजन वाढण्याचा धोकाही वाढतो.
पॅकेटमधील ज्यूस घातक
पॅकेटमधील ज्यूस आजकाल भरपूर लोक पितात. तर याबाबत एक्सपर्टनी सांगितलं की, बाजारात मिळणाऱ्या ज्यूसमध्ये शुगरचं प्रमाण अधिक असतं. हे ज्यूस जास्त काळ टिकून रहावे म्हणून यात नुकसानकारक प्रिजर्वेटिव्स टाकलेले असतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. त्यामुळे पॅकेटमधील ज्यूस टाळणं बरं.
डिहायड्रेशनमध्ये काय करावं?
जेव्हा डिहायड्रेशनची समस्या होते, तेव्हा फळं आणि ज्यूस दोन्हींचं सेवन करू शकता असा सल्ला एक्सपर्टनी दिला. ज्यूस अशात शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. मात्र, फायबरच्या कमतरतेमुळे याचा प्रभाव कमीच दिसतो. त्यामुळे अशावेळी थेट फळं खाणं अधिक फायदेशीर ठरतील.