आहार हा फक्त पोट भरण्या करताच किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून घ्यायचा नसतो. आहारातून शरीराचं पोषण होतं. आरोग्य राखलं जातं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहाराचा विचार करताना पदार्थातील पोषण मुल्यांचा विचार केला जातो. तसेच अमूक पदार्थ कधी खावा, कशासोबत खावा या गोष्टींनाही विशेष महत्त्व असतं. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. चुकीच्या खाण्यानं, चुकीच्या पध्दतीनं खाण्यानं पचनाचे, त्वचेचे विकार उद्भवतात.मात्र या परिणामांकडे आजारासारखं बघितलं जातं. पण हे परिणाम आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे उद्भवलेले आहेत हे लक्षातही येत नाही. याकडे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार लक्ष वेधतात. त्या म्हणतात आहाराचं एक शास्र असतं. ते पाळलं तर आहार हे औषधासारखं काम करतं पण हे शास्त्र डावललं, चुकवलं तर मात्र ते विषासारखं असतं.
डॉ. दीक्षा भावसार म्हणतात आहारातून आपल्याला आरोग्य, पोषण, ऊर्जा आणि उत्साहच मिळायला हवा, ते सोडून जर त्रास होत असेल तर मात्र आपलं खाणं, आपल्या खाण्याच्या सवयी, वेळा हे तपासून घ्यायला हवं.
आरोग्य बिघडवणार्या आहार सवयी
Image: Google
1. दूध फळं एकत्र खाणं
डॉ. भावसार म्हणतात की विरुध्द आहार हा आरोग्य बिघडवणारा आहार आहे. काही खाद्य पदार्थ हे एकेकटे खाल्ले तर ते आरोग्यास उत्तम लाभ देतात. मात्र या पदार्थांचा संयोग चुकीच्या पदार्थांसोबत केला तर ते विषासमान काम कातात. दूध आणि फळं, फळं आणि दही, ताक आणि फळं हा चुकीचा संयोग असून तो टाळायला हवा. दूध, फळं, दही, ताक हे स्वतंत्ररित्या सेवन करणं हे गुणकारी असतात, मात्र एकमेकांसोबत खाल्ल्यास ते अपाय करतात. पचनक्रिया बिघडवण्यास हे संयोग कारणीभूत ठरतात. या चुकीच्या संयोगामुळे शरीरात विषारी घटक निर्माण होतात. केळ हे जर दूध, दही किंवा ताकासोबत खाल्लं तर सर्दी, खोकला किंवा अँलर्जीसारखे त्रास होतात.
2. तूप आणि मध समप्रमाणात खाणं
देवासाठी पंचामृत करताना घरातील जेष्ठ मंडळी तूप आणि मधाचं प्रमाण विषम घेण्यास सांगतात. यामागचं कारण ते सांगत नसले तरी त्याला आहाराशास्रात नेमकं कारण आहे. कारण तूप आणि मध हे समप्रमाणात खाल्लं तर शरीरात त्याची उलट प्रतिक्रिया होते. कारण मध हे गुणानं उष्ण असतं तर तुपात शरीराला थंडावा देणारे, आद्र्रता देणारे घटक असतात. त्यामुळे तूप आणि मध एकत्र खाण्याची वेळ आली तर एकाचं प्रमाण जास्त आणि दुसर्याचं कमी घ्यावं असा नियम आहे.
Image: Google
3. मध गरम करुन खाणे
मध हे कधीही गरम करुन खाऊ नये. यामुळे पचन क्रियेस उत्तेजन देणारे विकर नष्ट होतात. मध गरम करुन खाल्ल्याने शरीरात विषारी घटक हळू हळू जमा होतात.
4. रात्री दही खाणं
हिवाळ्याच्या दिवसात दही आणि पनीर खाणं आरोग्यदायी असतं. पण दही आणि पनीर हे पदार्थ शक्यतो दिवसाच खायला हवेत.
5. गरम गार एकत्र
आइस्क्रीम आणि हॉट चॉकलेट एकत्र खाण्याची पध्दत सध्या रुढ आहे. टोकाचं गरम आणि टोकाचं गार एकत्र करुन खाण्याची ही फॅशन आरोग्यास त्रास देणारी आहे.