जेवणानंतर गोड पदार्थ खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे असं समजून तुम्हीही ते खाणं टाळता का? जर तुम्ही असं करत असाल तर आता तुमच्यासाठी महत्त्वाची आणि एक नवीन माहिती समोर आली आहे. प्राचीन भारतीय औषध प्रणाली असलेल्या आयुर्वेदानुसार, जेवणानंतर थोडं गोड खाणं केवळ चवीसाठीच नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेदिक तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, योग्य प्रमाणात आणि पद्धतीने गोड पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला अनेक फायदे मिळतात.
आयुर्वेदात, अन्न तीन गोष्टीत विभागलं गेलं आहेत - गोड, आंबट आणि तिखट. जेवणाची सुरुवात गोड पदार्थाने करावी आणि शेवट गोड पदार्थाने करावा असा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर गूळ, मध, मिठाई, खीर किंवा हलवा यांसारख्या गोड पदार्थांचं सेवन केल्याने पचनसंस्था सक्रिय होण्यास मदत होते. गोड चव पचनशक्ती संतुलित करते आणि पोटात निर्माण होणारी अतिरिक्त उष्णता शांत करते, ज्यामुळे अपचन आणि गॅससारख्या समस्या कमी होतात.
तज्ज्ञ काय म्हणतात?
आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. प्रिया शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोड चव वात आणि पित्त दोष नियंत्रित करते. जेवणानंतर थोडासा गूळ किंवा मध खाल्ल्याने शरीरातील उर्जेची पातळी वाढते आणि ताण कमी होतो. ही नैसर्गिक साखर रक्तातील साखर अचानक वाढवत नाही, तर हळूहळू ऊर्जा प्रदान करते. याशिवाय, मिठाईमध्ये असलेलं लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे सूक्ष्म पोषक घटक शरीराला शक्ती प्रदान करतात.
'हे' ठेवा लक्षात
याचा अर्थ असा नाही की, तुम्ही मोठ्या प्रमाणात साखर किंवा प्रक्रिया केलेले गोड पदार्थ खावेत. जास्त साखरेमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदात, नैसर्गिक आणि कमी प्रमाणात गोड पदार्थांचं सेवन फायदेशीर मानले जाते. उदाहरणार्थ, गुळाचा एक छोटा तुकडा किंवा एक चमचा मध पुरेसा आहे.