गरमागरम जेवणासोबत आपल्याला काहीतरी तोंडी लावायला कुरकुरीत, चुरमुरीत असं लागतच. अशावेळी आपण पापड, फेण्या, ताकातील मिरच्या, लोणचं असं तोंडी लावायला जेवणासोबत काहीतरी खातोच. कित्येक वेळा आपली नावडती भाजी ताटात आल्यावर जेवणाचा मूड निघून जातो. अशा परिस्थिती जर कोणी आपल्याला गरमागरम पापड, फेण्या, सांडगे तोंडी लावायला दिले तर जेवण लगेच फस्त होते. परंतु बाहेरून विकत आणलेल्या तयार पापडामध्ये पापड खार खूप प्रमाणात वापरलेला असतो. जो आपल्या शरीराला खूप घटक असतो. अशावेळी जेवणासोबत कुरकुरीत काय खायचे हा प्रश्न पडतो. घरातील हेल्दी असणाऱ्या भाज्यांपासूनच आपण चटपटीत, कुरकुरीत पदार्थ तयार करू शकतो. कुरकुरीत भेंडी, कुरकुरीत कारले असे पदार्थ तर आपण खाल्लेच असतील. जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून कुरकुरीत तोंडली कशी बनवायची याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(Tendli Fry : Recipe).
साहित्य :-
१. तोंडली - पाव किलो२. मीठ - चवीनुसार ३. हळद - १ टेबलस्पून ४. धणे पावडर - १ टेबलस्पून ५. मिरची पावडर - १ टेबलस्पून ६. लिंबाचा रस - १ टेबलस्पून ७. बेसन - २ टेबलस्पून ८. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून ९. मक्याचे पीठ (कॉर्नफ्लॉवर) - २ टेबलस्पून १०. तळण्यासाठी तेल - ५ ते ६ टेबलस्पून
कुरकुरीत तोंडली कशी बनवायची याचे साहित्य व कृती काय याबाबतचा एक व्हिडीओ me_haay_foodie या इंस्टग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
कृती :-
१. तोंडली स्वच्छ धुवून घ्यावीत. २. तोंडली स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. ३. या तोंडलीचे उभे लांब काप करावेत. ४. हे तोंडलीचे काप एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यात मीठ, हळद, धणे पावडर, मिरची पावडर, लिंबाचा रस, बेसन, तांदुळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित मॅरीनेट करून घ्यावेत. ५. वरील मॅरिनेशन तोंडलीच्या कापांना नीट लावून घेतल्यानंतर थोडा वेळ तसेच राहू द्यावेत. ६. आता हे काप गरम तेलात सोडून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्या.
कुरकुरीत तोंडली खाण्यासाठी तयार आहे.