Lokmat Sakhi >Food > तुळशीची चटणी, तुळशीचं बटर खाल्लं कधी? करुन पहा औषधी तुळशीचे चविष्ट पदार्थ

तुळशीची चटणी, तुळशीचं बटर खाल्लं कधी? करुन पहा औषधी तुळशीचे चविष्ट पदार्थ

औषधी गुणांची खाण असलेली तुळस चवीच्या बाबतीतही किती कमाल करते त्यासाठी तुळशीचा उपयोग करुन केलेले तुळशीचा पेस्टो हम्मस, तुळशीची चटणी, तुळस बटर ब्रेड आणि टमाटा तुळस पिलाफ हे पदार्थ खाऊन बघाच. ताजातवाना करणारा हा तुळशीचा स्वाद साध्या पदार्थांचीही लज्जत वाढवतो. एक साध्या पदार्थाला उत्तम चव देण्याचं काम तुळस करते तसेच वेगळे पदार्थही पुढ्यात ठेवते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:12 PM2021-07-13T16:12:11+5:302021-07-13T17:19:00+5:30

औषधी गुणांची खाण असलेली तुळस चवीच्या बाबतीतही किती कमाल करते त्यासाठी तुळशीचा उपयोग करुन केलेले तुळशीचा पेस्टो हम्मस, तुळशीची चटणी, तुळस बटर ब्रेड आणि टमाटा तुळस पिलाफ हे पदार्थ खाऊन बघाच. ताजातवाना करणारा हा तुळशीचा स्वाद साध्या पदार्थांचीही लज्जत वाढवतो. एक साध्या पदार्थाला उत्तम चव देण्याचं काम तुळस करते तसेच वेगळे पदार्थही पुढ्यात ठेवते.

Ever eaten basil chutney, basil butter? Try the delicious medicinal basil in recipe | तुळशीची चटणी, तुळशीचं बटर खाल्लं कधी? करुन पहा औषधी तुळशीचे चविष्ट पदार्थ

तुळशीची चटणी, तुळशीचं बटर खाल्लं कधी? करुन पहा औषधी तुळशीचे चविष्ट पदार्थ

Highlightsफिंगर चिप्स किंवा ब्रेड, सॅण्डविच सोबत खाण्यास तुळशीचा हम्मस कमाल लागतो.तुळशीची चटणी मूड एकदम फ्रेश करुन टाकते.टमाटा तुळस पिलाफ हा एक पुलावाचाच प्रकार आहे. एखाद्या पार्टीसाठीचा उत्तम मेन्यू असून फक्त अध्र्या तासात तयार होतो. ,

आपल्या प्रत्येकाच्या अंगणात, गॅलरीत तुळस असतेच. हवा शुध्द करण्याचं काम तुळस करते हा त्यामागचा हेतू. तुळस ही एक औषधी वनस्पती आहे म्हणून तिला आयुर्वेदातही महत्त्वाचं स्थान आहे. इतकंच नाही तर छोट्या मोठ्या आजारांसाठी आजची बटव्यातले कितीतरी उपाय हे तुळशीचा उपयोग करुन होणारे आहेत. तुळशीमधे सूज आणि दाह कमी करणारे घटक असतात तसेच पचन नीट होण्यासाठी, डोकेदुखी घालवण्यासाठीही तुळशीचा उपयोग होतो. एक औषधी वनस्पती एवढाच आपल्याला तुळशीचा उपयोग माहित आहे. पण जगभरातल्या खवय्यांना लुभावतो तो तुळशीचा स्वाद. ताजातवाना करणारा हा तुळशीचा स्वाद साध्या पदार्थांचीही लज्जत वाढवतो. एक साध्या पदार्थाला उत्तम चव देण्याचं काम तुळस करते. तुळशीचा उपयोग हा सूप, पुलाव, चटणी तसेच गोड पदार्थातही केला जातो.
 औषधी गुणांची खाण असलेली तुळस चवीच्या बाबतीतही किती कमाल करते त्यासाठी तुळशीचा उपयोग करुन केलेले काही पदार्थ नक्कीच करुन आणि खावून पाहायला हवेत.

तुळशीचा पेस्टो हम्मस

फिंगर चिप्स किंवा ब्रेड, सॅण्डविच सोबत खाण्यास हा तुळशीचा हम्मस कमाल लागतो. हा हम्मस तयार करण्यासाठी दोन कप भिजवून उकडलेले चणे, 4- 5 लसूण पाकळ्या, पाव कप पाइनच्या बिया, एक कप तुळशीची पानं , अर्धा कप ऑलिव्ह ऑइल, पाव कप पार्मेसन चीज, दोन चमचे लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ हे साहित्य तुळशीचा हम्मस करण्यासाठी लागतं.
 आधी पेस्टो बनवून घ्यावा. तुळशीची पानं, लसूण, पार्मेसन चीज, पाइन बिया हे मिक्सरच्या भांड्यात टाकावं. त्यात ऑलिव्ह ऑइल घालावं. ते चांगलं वाटून घ्यावं. मग त्यात उकडलेले चणे आणि मीठ घालून परत एकदा ते मऊसर वाटावं.
हे वाटण एका भांड्यात काढावं. नंतर त्यात लिंबाचा रस घालावा. तो चांगला त्यात मिसळून घ्यावा. मग त्यावर थोडं ऑलिव्ह ऑइल घालावं, त्यावर लाल तिखट भुरभुरावं आणि वर तुळशीची पानं ठेवावी. हा हम्मस चिप्स, ब्रेड, सॅंडविचसोबत छान लागतो.

 

तुळशीची चटणी

ही चटणी मूड एकदम फ्रेश करुन टाकते. तुळशीची पानं, कांदा, आलं, कोथिंबिर आणि सफरचंद या जिन्नसातून तयार होणारी ही चटणी. ती करायला फक्त 15 मिनिटं लागतात. ही चटणी कबाब, भजी, इडली, डोसा यंच्यासोबत छान लागते.
ही चटणी तयार करण्यासाठी 150 ग्रॅम तुळशीची पानं, 100 ग्रॅम कोथिंबीर, दोन कांदे चिरलेले,दोन सफरचं सोलून चिरलेले, एक मिरची, एक चमचा मीठ, दोन इंच आलं दोन चमचे चिंचेचा कोळ ही सामग्री लागते.
हे सर्व साहित्य मिक्सरला लावून छान बारीक करुन घ्यावं. ही चटणी फ्रीजमधे ठेवल्यास बर्‍याच दिवस टिकते.

तुळस बटर ब्रेड 

तुळस बटर ब्रेड आणि वर बन्र्ट चीज हे कॉम्बिनेशनच खवय्यांच्या तोंडाला पाणी आणतं. प्रामुख्यानं पावसाळ्यात हा पदार्थ अवश्य खावा असा आहे. पावसाळ्यातल्या रविवारचा ब्रंच मेन्यू.
यासाठी एक फ्रेंच बगेटी, 14 लसूण पाकळ्या, दीड चमचा सॉल्टेड बटर, अर्धा कप तुळशीची पानं, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल, चिमूटभर मीठ, दोन चमचे किसलेल प्रोसेस्ड चीज हे जिन्नस लागतं.
 लसूण पाकळ्या ओबडधोबड चेचाव्यात. त्यात तुळशीची पानं चुरगळून टाकावी आणि चिमूटभर मीठ घालावं. यात अर्धा चमचा ऑलिव्ह तेल घालून बारीक वाटण करुन घ्यावं. एका छोट्या भांड्यात बटर घ्यावं . ते वितळून घ्यावं. त्यात तुळस आणि लसणाची पेस्ट घातली की तुळस बटर तयार होतं. ब्रेड अर्ध कापावा. त्याचे आडवे काप करावेत. आणि त्याल हे तुळस बटर लावावं. वरुन चीझ किसून घालावं. 12 ते 15 मिनिटं 200 डिग्रीवर ओव्हनमधे बेक करावा. हा ब्रेड खाल्ला की पोट भरतं आणि मनही तृप्त होते.

 

टमाटा तुळस पिलाफ

हा एक पुलावाचाच प्रकार आहे. एखाद्या पार्टीसाठीचा उत्तम मेन्यू आहे. तुळस, टमाटा, कांदा आणि लसूण यामुळे या भाताची चव वाढते. अध्र्या तासात हा भात तयार होतो.
हा भाताचा प्रकार करण्यासाठी एक चमचा बटर, एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, 4-5 काळी मिरी, 1 तेजपान, अर्धा चमचा शहाजिरे, 3-4 लसूण पाकळ्या, एक चिरलेला टमाटा, 3-4 चमचे टमाटा प्युरी, 1 कप बासमती तांदूळ, धुवून, निथळून घेतलेला, तुळशीची पानं आणि दोन कप पाणी किंवा भाज्या उकळलेलं पाणी लागतं.
एका खोलगट भांड्यात बटर घालावं. त्यात कांदा परतून घ्यावा. मिरे , तेज पान, शाही जिरे, लसून, टमाटा घालून ते दोन तीन मिनिटं परतून घ्यावं. त्यात टमाटा प्युरी घालावी आणि दोन मिनिटं ते शिजू द्यावं. निथळलेले तांदूळ, मीठ, तुळशीची पानं आणि भाज्या उकळलेलं पाणी घालावं. भात शिजला की त्यावर पुन्हा तुळशीची पानं घालावीत. हा पिलाफ चवीला उत्तम लागतो. कुठे सहलीसाठी किंवा चव बदल म्हणून शाळा-ऑफिसच्या डब्यासाठीही करता येतो.

Web Title: Ever eaten basil chutney, basil butter? Try the delicious medicinal basil in recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.