आपण घेत असलेल्या आहारातून आपल्या शरीराचे पोषण व्हावे यासाठी आपण कायम प्रयत्नशील असतो. जास्तीत जास्त चांगले खाल्ले तर शरीर आणि पर्यायाने आरोग्य चांगले राहील म्हणून आपण पौष्टीक खाण्याचा प्रयत्न करतो. हे जरी खरे असले तरी आपण स्वयंपाक करताना नकळत काही चुका करतो. ज्यामुळे आपल्या केसांचे पोषण कमी होते. खाल्लेल्या अन्नातून पुरेसे पोषण मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय? म्हणूनच स्वयंपाक करताना टाळायला हव्यात अशा काही चुकांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आपल्याला आपण घेत असलेल्या आहारातून पूर्ण पोषण मिळण्यास मदत होईल.
१. पाणी फेकून देणे
काही वेळा आपल्याला एखादी रेसिपी करण्यासाठी भाज्या उकडून घ्याव्या लागतात. पण त्यानंतर या भाजीतील पाणी आपल्याला नको असते. भाज्या उकडण्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने आपण त्यामध्ये पाणी घालतो. मात्र उकडून झाल्यानंतर हे पाणी आपण अनेकदा फेकून देतो. असे करण्याने त्या भाजीतील पाण्यात उतरलेले पोषण वाया जाते. अशावेळी हे पाणी बाजूला तसेच ठेूवन द्या. या पाण्यापासून आपण सूप तयार करु शकतो. इतकेच नाही तर इतर कोणता पदार्थ शिजवताना त्यामध्ये पाणी घालायचे असल्यास हे पाणी आपण जरुर वापरु शकतो. या पाण्यात कणीकही मळता येऊ शकते. त्यामुळे भाज्यांमधील पोषण वाया न जाता त्याचा शरीराला उपयोग होईल.
२. भाजीची साले काढणे
आपण भाजी करताना अनेकदा भाज्यांची साले काढून घेतो. अनेकदा ही साले इतकी जाड काढतो की त्यामुळे भाजीही काही प्रमाणात वाया जाऊ शकते. भाजीच्या सालांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. अशाप्रकारे साले काढल्याने भाजीचे पोषण कमी होते. अशावेळी आपण जेवणे म्हणजे केवळ पोट भरण्याचे काम करतो पण अन्नातील पोषण मात्र वाया जाते. त्यामुळे जास्तीत जास्त भाज्या साले न काढता करुन पाहा. अगदीच काढायचे झाले तर पातळ साल काढा जेणेकरुन भाजीतील पोषण वाया जाणार नाही.
३. पदार्थ तळणे
कोणताही पदार्थ भाजला किंवा उकडला तर त्यातले पोषण टिकून राहते. मात्र हाच पदार्थ आपण जेव्हा तळतो तेव्हा त्यातील पोषण कमी होते. तळल्यामुळे आपल्या शरीरात तर तेल जातेच पण आपल्या कॅलरीजमध्येही वाढ होते. तळलेले पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या इतरही तक्रारी वाढतात. मात्र एखादा पदार्थ तळण्याशिवाय पर्याय नसेल तर तो डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय करा. त्यामुळे तळल्याचा फिलही येईल आणि जास्त तेलही पोटात जाणार नाही.
४. चुकीच्या भांड्यांचा वापर
अनेकदा आपण ऩॉन स्टीक, अॅल्युमिनीअम यांसारख्या भांड्यांमध्ये पदार्थ तयार करतो. मात्र यामुळे पदार्थाचे पोषण कमी होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा लोखंड, स्टील, पितळ अशाप्रकारच्या भांड्यांमध्ये पदार्थ तयार केल्यास ते आरोग्यासाठी निश्चितच चांगले असते.