- माधुरी पेठकर
कतरिना आणि विकी कौशलचं लग्न साग्रसंगीत पार पडलं. या लग्नाचं कवित्व भरपूर काळ चालणार आहे. अशा शाही लग्नातल्या बारीक बारीक गोष्टींचीही बातमी होते हे तर माहितच आहे. तशीच बातमी त्यांच्या लग्नातील जेवणाच्या मेन्यूचीही झाली. असंख्य पदार्थ, त्यांचे अनेक प्रकार जेवणासाठी होते. उदाहरणच द्यायचं झालं तर जेवणात 100 चवींचा समोसा ठेवलेला होता. प्रत्येक समोसा म्हणे वेगवेगळ्या चवीचा. त्यांच्या मेन्यूमधला एक पदार्थ मात्र खूपच वेगळा वाटला. तो म्हणजे गुजराती बकलावा.
Image: Google
सवाई मुधोपूर जिथे कतरिना आणि विकी कौशलचं लग्न झालं त्या सवाई मुधोपुरातील चुडी मार्केटमधील ‘ पारस नमकीन अँण्ड स्वीटस’चा नंबर लावला. पण त्यांनी सांगितलं की, ‘हमारे यहा सिर्फ राजस्थानी मिठाई बनती है, गुजराती मिठाईया तो हम बनातेही नही, लेकिन शादी मै जिस हलवाई ने गुजराती बकलावा दिया उसका नंबर है मेरे पास!’ ‘जनता जोधपूर स्वीट होम’च्या कैलाश शर्मा यांचा नंबर त्यांनी दिला. खरोखर या कैलाश शर्मा यांनीच लग्नात गुजराती बकलावा ही मिठाई पुरवली होती. मग कैलाश यांना गुजराती बकलावा बद्दल विचारलं. मी एवढ्या लांबून फोन केला म्हणून गाडी चालवत असलेले कैलाश शर्मा जरा दोन मिनिटं गाडी थांबवून बोलले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा ‘गुजराती बकलावा’ पदार्थ म्हणजे खास 'जनता जोधपूर स्वीट होम'नं इन्व्हेण्ट केलेला पदार्थ आहे.
Image: Google
गुजराती बकलावा नव्हे ड्रायफ्रूटस बकलावा!कैलाश शर्मा सांगतात, ‘गुजराती बकलावा नाही तर याला ड्रायफ्रूटस बकलावा म्हणावं. हा पदार्थ भाजून केला जातो. यासाठी खास सवाई माधोपूर येथे मिळणारं मधू घी हे तूप वापरलेलं असून तो शुगर फ्री आहे. शुगर फ्री असला तरी या पदार्थाला हवा तो गोडवा आणण्यासाठी शुध्द मधाचा वापर केला जातो. ड्रायफ्रूटस बकलावा साठी त्यांनी बदाम, काजू, पिस्ता हा सुकामेवा भाजून वापरला.’ आपण वेलची पावडरही वापरली असं सांगत ते म्हणाले, हा पदार्थ घरी बनवता येत नाही. त्यासाठी फार मेहनत लागते. मशिन्स लागतात. संयम ठेवावा लागतो. तेव्हा कुठे खुसखुशीत आणि अनेक पदारांचा, तोंडात घातल्याबरोबर विरघळणारा शाही चवीचा पदार्थ तयार होतो.
Image: Google
कैलाश शर्मांचा हा कतरिना-विकी लग्नातला बकलावा त्यांनी बरेच बदल करुन इन्व्हेण्ट केला म्हणतात.कारण त्यांनी शुगरलेस ड्रायफ्रूट बकलावा केला होता. साखर वापरली नव्हती. तर केवळ शुध्द मधाचा उपयोग केला होता. बटर ऐवजी त्यांच्याकडे मिळणार्या खास तुपाचा वापर केलेला होता. आणि वेलची पावडर टाकली हे त्यांनी आवर्जून सांगितल्याचं लक्षात आलं कारण एरवी बकलावा करताना विशिष्ट स्वादासाठी दालचिनीचा वापर केला जातो.
Image:Google
मग मूळ बकलावा कुठला? आपला की परदेशातला?
बकलावा हे तुर्कीश डेझर्ट आहे. हा पदार्थ नवा नसून या पदार्थाचे मूळ इसपूर्व 8 व्या शतकातील आहे. ऑटोमन तुर्की राजाच्या राजवटीत बकलावाची ओळख पेस्ट्री म्हणून होती. आता आधुनिक काळात या बकलावाची सुधारित पध्दत ग्रीसमधे शोधली गेली. ग्रीक रेस्टॉरण्टमधे आणि तेथील खाद्य पदार्थांच्या दुकानात बकलावा मिळतो. पण हा बकलावा केवळ ग्रीस आणि तुर्कीपुरताच मर्यादित नाही. त्याच्या विशिष्ट चव आणि पोतामुळे हा बकलावा जगभर प्रसिध्द आहे. बकलावात त्या त्या देशांनी आपल्या चवीनुसार बदलही केले आहेत. आता तर स्पेन, फ्रान्स, मोनॅको, इटली, ग्रीस, तुर्की, इस्त्राएल, इजिप्त, लिबिया या भूमध्यसागरी देशांनी बकलावात त्यांच्या त्यांच्या पध्दतीने बदल केले आहेत. त्यामुळे कुठल्या एका देशानं बकलावा तयार करायला सुरुवात केली हे अजूनही निश्चित सांगता येत नाही.
Image: Google
बकलावाची स्पेशालिटी काय?
बकलावात आता खूप बदल झालेले असले तरी मूळ बकलावा आणि आताच्या आधुनिक काळातला बकलावा यात काही मूळ घटक तेच आहेत. मैदा, सुकामेवा ( त्यातही पिस्ता आणि अक्रोडच) , मध ही या पदार्थाची मुख्य सामग्री. आता बकलावा करण्यासाठी पिझ्झाचा जसा बेस मिळतो तशा बकलावाचाही बेस मिळतो.
बकलावाचा बेस हा फिलो शीटसचा असतो. हे फिलो शीटस कागदाप्रमाणे पातळ असून ते फिलो पीठापासून तयार करतात. मैदा, तेल किंवा व्हाइट व्हिनेगर आणि पाणी वापरुन फिलो डफ ( पीठ) तयार केलं जातं. मशीनद्वारे ते खूप मळलं जातं. त्याला पसरट आणि पातळ स्वरुप येऊन कागदासारखे फिलो शीटस बाहेर पडतात. हे फिलो शीटस पॅकेटमधे विकले जातात. एका पॅकेटमधे साधारणत: 24 फिलो शीटस वापरतात.
Image:Google
हे फिलोशीटस बकलावा बनवण्याच्या ट्रेमधे बटर लावून एक एक करुन ठेवलेले जतात. आधी सात थर लावले जातात. प्रत्येक फिलो शीटसचा थर लावताना त्याला व्यवस्थित बटर लावलं जातं. अशा प्रकार सात थर झाले की फिलो शीटसवर बटर लावून सुकामेव्याची भरड घातली जाते. ही भरड करण्यासाठी अक्रोड, पिस्ते साखर आणि दालचिनी वापरली जाते. आता पिस्त्यांबरोबर काजू बदाम यांचाही वापर केला जातो. त्यावर पुन्हा फिलोशीटस ठेवलं जातं. त्याला बटर लावून त्यावर सुक्या मेव्याची भरड पेरली जाते. सर्व शीट संपेपर्यंत थरावर थर दिले जातात . मग ते थोडा वेळ फ्रिजरमधे ठेवलं जातं. फ्रिजरमधे ठेवल्यानं त्याचे काप पाडणं सोपं जातं.
Image: Google
ओव्हन 300 अंश सेस्लिअसवर प्री हिट करुन मग याचे डायमंड आकाराचे काप केले जातात. हे बकलावा भाजण्यासाठी ओव्हनमधे ठेवतात. या बकलावाला सोनेरी रंग येईपर्यंत ते ओव्हनमधे ठेवले जातात. साधारणत: दोन अडीच तास लागतात. तोपर्यंत बकलावाला गोडवा आणणारा पाक केला जातो. या पाकासाठी पाणी, साखर, मध आणि लिंबाचा रस वापरला जातो. पाकासारखा घट्टपणा येण्यासाठी हे मिश्रण हाय गॅसवर खूप उकळलं जातं. बकलावा सोनेरी रंगाचे भाजून झाले की ते ओव्हनमधून बाहेर काढले जातात. आणि त्यावर तयार केलेला पाक टाकला जातो. रात्रभर ते तसेच ठेवले जातात. आणि मग सकाळी ते खाण्यास तयार होतात.असा हा बकलावा ड्रायफ्रूटस बकलावाच्या रुपात कतरिना-विकी कौशलच्या लग्नात कौतुकाचा विषय झाला. हा बकलावा एकदा खाऊन पाहायलाच हवा!