उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात आणि जवळपास सगळीकडेच अगदी स्वस्तात मिळणारं फळ म्हणजे टरबूज (water melon). आंब्यापेक्षाही टरबूज आवडीने खाणारे अनेक लोक आहेत. पण नेमकं टरबूज खाताना बहुतांश लोक एक चूक करतात आणि त्यामुळे मग टरबुजाचे योग्य लाभ शरीराला मिळू शकत नाहीत. म्हणूनच तर याविषयीची एक अतिशय महत्त्वपूर्ण पोस्ट डॉ. हेमंत जोशी आणि डॉ. अर्चना जोशी यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ एकदा बघून टरबूज खाण्याची अचूक पद्धत जाणून घेणं खरोखरंच गरजेचं आहे..(How to eat water melon properly?)
टरबूज चिरलं की आपण त्याचा लालसर भाग वेगळा काढतो आणि फक्त तेवढाच खातो. पांढरट आणि हिरवट भाग बऱ्याचदा फेकलाच जातो. काही जणं तर बिया देखील काढून टाकतात. पण टरबूजाचा लाल भाग जेवढा पौष्टिक आहे, तेवढाच पांढरा आणि हिरवा भागही आरोग्यदायी आहे, असं डॉ. जोशी सांगत आहेत. टरबुजाचा हिरवट आणि पांढरट भाग खाण्याचे फायदे आणि त्यापासून कोणत्या वेगवेगळ्या रेसिपी करता येतील, याची सविस्तर माहितीदेखील त्यांनी दिली आहे.
टरबुजाचा पांढरा भाग आणि हिरवे साल खाण्याचे फायदे (Benefits of eating water melon)
- टरबुजाच्या या भागांमध्ये सिटोलीना हा घटक मोठ्या प्रमाणात असतो. हा घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
- याशिवाय मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार नियंत्रित ठेवण्यासाठीही टरबुजाचा पांढरा आणि हिरवा भाग उपयुक्त आहे.
टरबुजाच्या पांढऱ्या भागापासून करा चवदार पदार्थ (benefits of eating white part)
- लाल भागाप्रमाणे हा पांढरट भाग काही गाेड नसतो. त्यामुळे तो चटकन खाल्ला जात नाही. म्हणूनच तर त्यापासून कोणकोणते छान, चवदार पदार्थ तयार करायचे, याची माहितीही डॉ. अर्चना जोशी यांनी सांगितली आहे.
- पांढरा भाग वेगळा काढून त्याची दुधी भोपळ्याप्रमाणे भाजी करून तुम्ही खाऊ शकता.
- पांढरा भाग किसून घ्या आणि त्याची छानशी कोशिंबीर करा. किंवा त्यापासून दह्यातलं रायतं करा आणि त्याला छान तूप, जिरे, हिंग, हिरवी मिरची घालून खमंग फोडणी द्या.
- पांढरा भाग किसून घ्या. त्याला थोड्याच वेळात पाणी सुटतं. या पाण्यात कणिक, डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ एकत्र करून भिजवा आणि त्यापासून पराठे, थालिपीट करा किंवा वडे करून तळून घ्या. चवदार लगेल. आवडत असतील तर कोफ्ते देखील करू शकता.
हिरव्या सालाचा आणि बियांचाही करा वापर
- टरबुजाची हिरवी सालं स्वच्छ धुवून किसून घ्या. त्यामध्ये दाण्याचा कुट, मीठ, थोडीशी साखर टाका. वरतून जिरे- तूप- हिंग घालून खमंग फोडणी द्या. चवदार कोशिंबीर तयार.
- टरबुजाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि खनिजे असतात. त्यामुळे या बियादेखील खाल्ल्या पाहिजेत.