भेंडीची भाजी म्हटलं की ती फारशी कुणालाच आवडत नाही. भेंडीच्या भाजीला असणारा बुळबुळीतपणा यामुळेच बहुतांश लोकांची ती नावडती भाजी आहे. झटपट होणारी आणि चवीलाही छान लागणारी ही भाजी आपण नेहमी करतो. कधी ही भाजी छान मोकळी होते तर कधी खूपच चिकट होऊन या भाजीचा गचका होतो, त्यामुळे अशी चिकट भाजी खायला नकोसे वाटते. असे असले तरीही भेंडीमध्ये आरोग्यासाठी अनेक उपयुक्त असे गुणधर्म असतात, त्यामुळे भेंडीचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. भेंडीची भाजी सगळ्यांच्या घरात तयार केली जाते परंतु ती बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. एकाच प्रकारची भेंडी आपण अनेक पद्धतींनी करु शकतो. कांदा घालून दाण्याचा कूट घालून किंवा नुसती मिरची तसेच आमसूल आणि धणे - जिरे पावडर घालून भेंडीची भाजी केली जाते. भेंडी मसाला हा तर सगळ्यांच्या आवडीचा प्रकार. तेलावर फ्राय केलेली ही भेंडी मसाला किंवा भरली भेंडी बहुतेक सगळ्यांचं आवडते(Farah Khan Special Bhindi Recipe).
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध निर्माती, दिग्दर्शक, अभिनेत्री असणारी फराह खान (Farah Khan) हिने नुकतीच तिच्या आवडत्या भेंडीची एक खास रेसिपी शेअर केली आहे. तिने तिच्या चाहत्यांसाठी तिला आवडणाऱ्या क्रिस्पी भेंडीची साधी - सोपी रेसिपी व्हिडीओमार्फत शेअर केली आहे. क्रिस्पी भेंडीची ही सोपी रेसिपी आपण घरी देखील नक्की ट्राय करु शकतो. यासाठी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण ही रेसिपी झटपट करु शकतो. फराह खानने शेअर केलेल्या या रेसिपीमधील भेंडी अजिबात बुळबुळीत न होता एकदम क्रिस्पी होणार आहे. त्यामुळे अशी चिकट बुळबुळीत न होणारी भेंडी घरात लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील. क्रिस्पी भेंडी कशी करायची याची रेसिपी पाहूयात(Farah Khan's Favourite Crispy & Chatpati Bhindi Recipe).
साहित्य :-
१. बेसन - १/२ कप
२. भेंडी - गरजेनुसार
३. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
४. धणे पूड - १ टेबलस्पून
५. मीठ - चवीनुसार
६. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
७. चाट मसाला - १ टेबलस्पून
८. लाल मिरची पावडर - १/२ टेबलस्पून
इडली- डोशाचे पीठ खूप आंबले तर वाया जाते, लक्षात ठेवा ५ गोष्टी! पीठ फसफसणार नाही...
पारंपरिक बेने डोसा फक्त १० मिनिटांत करण्याची पाहा भन्नाट कृती, पारंपरिक साऊथ इंडियन डोसा...
कृती :-
१. सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवून, पुसून नेहमीची गोलाकार आकारात किंवा उभी कापून घ्यावी.
२. आता ही चिरलेली भेंडी एका बाऊलमध्ये घेऊन त्यात बेसन घालावे. बेसन घालून चमच्याने व्यवस्थित ढवळून हे बेसन भेंडीच्या तुकड्यांना लागेल असे थोडे मिक्स करून घ्यावे.
मदुराई स्पेशल ‘थन्नी चटणी’ खाऊन तर पाहा, इडली-डोसा लागेल मस्त-चमचमीत चटणीची रेसिपी...
३. त्यानंतर एका कढईत थोडे तेल घेऊन त्यात ही भेंडी घालून २ ते ३ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावी.
४. ही भेंडी तेलात फ्राय केल्याने ती भजी सारखी कुरकुरीत होईल. भेंडी तेलात परतून झाल्यानंतर ती एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी.
५. भेंडी गरम असतानाच त्यावर धणे पूड, मीठ, लाल तिखट मसाला, चाट मसाला, लाल मिरची पावडर चवीनुसार भुरभुरवून घ्यावी.
क्रिस्पी भेंडी खाण्यासाठी तयार आहे. रोज रोज त्याच भेंडीच्या भाजीचा कंटाळा आला असेल तर आपण ही झटपट तयार होणारी क्रिस्पी भेंडी झटपट तयार करू शकतो.